मनोज जरांगे-पाटील मंगळवारी ठाण्यात सभेसाठी येणार आहेत. या सभेआधी त्यांचे ठाण्यात विविध ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे शहरात होणारी संभाव्य कोंडी टाळण्यासाठी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. सभास्थळी दाखल होण्याआधी पाटील यांचे खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी, ठाणे महापालिका मुख्यालय येथे स्वागत होणार आहे. तसेच, अल्मेडा चौक, वंदना सिनेमा मार्ग, गजानन महाराज चौक, पु. ना. गाडगीळ चौक, मुस चौक येथून मार्गस्थ होणारे पाटील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे सभेसाठी येणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी वाहतूक बदल जाहीर केले आहेत.
* असे आहेत बदल
– डॉ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉ. मुस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टॉवरनाका, टेंभीनाकामार्गे पुढे जातील.
– गडकरी चौक येथून डॉ. मुस चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने अल्मेडा चौक, वंदना सिनेमा चौक, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवासमार्गे पुढे जातील.
– न्यू इंग्लिश शाळा येथून राम मारूती रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना न्यू इंग्लिश शाळेपासून काही अंतरावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने बेडेकर रुग्णालय, राजमाता वडापावमार्गे पुढे जातील.
– पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स चौक येथून तलावपाळीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापावमार्गे पुढे मार्गस्थ होतील.
नोकरदारांना फटका बसण्याची शक्यता
सकाळी कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानाकाकडे येणाऱ्या रिक्षा, खासगी वाहने व दुचाकीस्वारांना या वाहतूक बदलांचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळी दहा वाजता जरांगे-पाटील यांची सभा असल्याने पहाटेपासूनच ठिकठिकाणांहून मराठा समाजातील कार्यकर्ते ठाण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
जरांगे-पाटील यांचा रोड शो पोलिस परिमंडळ एकमधील कळवा, राबोडी, ठाणेनगर, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणार असल्याने या पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. यासोबतच एसआरपीएफच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.