जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण करताना सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करताना मनोज जरांगे यांच्यावरही जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं पण ओबीसीला धक्का न लागता ते आरक्षण द्यावं, असं सरकारला आवाहन करताना सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांचा भुजबळांनी यथेच्छ समाचार घेतला. एवढे मराठे नेते असतानाही, तुम्ही माझ्यावरच टीका का करता? असा सवाल त्यांनी विचारला होता. यावेळी भुजबळांनी लाखभर लोकांसमोर जुन्या अंदाजात भाषण ठोकून जरांगेंविरोधात तलवार उपसून ओबीसींच्या हक्कासाठी मी शेवटपर्यंत लढेन, असा शब्द दिला. त्यांच्या याच भाषणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी दर्शवली.
दोन समाज भिडवून राजकर्त्यांना आनंद मिळवायचा आहे की प्रश्न सोडवायचा आहे?
ओबीसींच्या हक्काची भाषा करताना भुजबळ करत असलेल्या विधानांनी दोन समाज भिडतील. दोन समाज भिडवून राजकर्त्यांना आनंद मिळवायचा की प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करायची आहे, हा खरा प्रश्न असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. एखादी भूमिका घेताना ती समंजस पद्धतीने घ्यावी. लोकांच्या हातात भाले तलवार येतील, अशी भूमिका घेऊ नये. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने भुजबळांनी टाळावीत, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.
कुणी समाजात उभी फूट पाडू पाहत असेल तर ते मला मान्य नाही
माझ्या समाजाच्या हक्कांसाठी मी लढत आहे. इतरांना त्याने त्रास होईल, वेदना होतील, अशाप्रकारे मी भूमिका घेणार नाही. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढतायेत. आम्ही आमच्या समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी लढतोय. कुणी समाजात उभी फूट पाडू पाहत असेल तर ते मला मान्य नाही. मग तो कोणताही नेता असो, ओबीसीचा असो किंवा मराठा नेता असो, अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवारांनी घेतली.
दोन समाजातली दरी आपल्याला परवडणारी नाही
जालन्याच्या अंबडमधील सभेला ओबीसी बांधवांची सभा म्हणून मी गेलो होतो. पण आता इथून पुढे छगन भुजबळ यांच्या मंचावर कोणत्याही सभेला मी जाणार नाही. दोन समाजात फूट पाडणारी विधाने मला कदापि नको आहेत. दोन समाजातली दरी आपल्याला परवडणारी नाही, याकडेही वडेट्टीवारांनी लक्ष वेधले.