• Sat. Sep 21st, 2024

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं

मुंबई: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने मोक्याच्या क्षणी लौकिकाला साजेसा खेळ करत भारतीय संघाला घरच्या मैदानावर चीतपट केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. भारतीय संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला असता तर त्याचे सर्व श्रेय घेण्याची पुरेपूर तयारी भाजपने केली होती. मात्र, कालच्या सामन्याच्या दुर्दैवी निकालामुळे भाजपच्या तयारीवर पाणी फेरले गेले. मी भाजपच्या दु:खात सहभागी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जल्लोषात होणाऱ्या बेस्ट फिल्डर सेरेमनीमध्ये भयाण शांतता, भारताच्या ड्रेसिंग रूममधील गलबलून टाकणारा VIDEO

भारतीय संघ हारला याचं दु:ख सगळ्यांना आहे. पण भारताकडे तेवढी खिलाडूवृत्ती आहे, खेळात हार-जीत होत असते. जो संघ सलग १० सामने जिंकला, तो अंतिम सामन्यात पराभूत झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. एरवी अशाप्रकारचे क्रिकेटचे सामने हे भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर किंवा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर होत असतात. पण यावेळेस क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली होती. त्यांनी आधी वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केले. मग तिकडे विश्वचषकाचा अंतिम सामना घेऊन सगळं श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. वर्ल्डकप मोदींमुळेच जिंकल्याचे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये शक्यतो असं होत नाही. मला भारतीय संघाविषयी व्यक्तिगत टिप्पणी करायची नाही. पण भाजप जगाला जणू असं दाखवायचा प्रयत्न करत होता की, हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा आहे. जिंकल्यानंतर भाजपला सगळे श्रेय घेता आले असते. स्टेडियमवर त्या प्रकारची राजकीय व्यवस्था करण्यात आली होती. वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, अशा थाटात भाजप पक्ष वावरत होता, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

रोहित शर्मा म्हणजे जगातला सर्वात…; शतकवीर हेडनं हिटमॅनच्या जखमेवर मीठ चोळलं

भाजपने कपिल देवला आमंत्रित केलं नाही कारण…

यावेळी संजय राऊत यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाचा उल्लेख केला. कपिल देव हे भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे कर्णधार होते. मात्र, अहमदाबाद येथील अंतिम सामन्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. कपिल देव त्याठिकाणी आले असते तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागले असते. क्रिकेटच्या पडद्यामागे सुरु असलेल्या या राजकारणावर भविष्यात नक्कीच चर्चा होईल. मुंबईतील वानखेडे मैदान हे क्रिकेटची पंढरी आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावरही क्रिकेटचा माहौल असतो. पण मुंबईतून उद्योग, कार्यालयं, पैसा असं सगळंच ओरबाडून न्यायचं या ओढाताणीत जरा गडबड झालेली दिसत आहे. भारतीय संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल हारला. ही फायनल वानखेडेवर झाली असती तर आपण जिंकलो असतो, अशी चर्चा सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed