आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिकच्या गोविंदनगर भागात असलेल्या अशोक प्राइड बिल्डिंग मध्ये बिबट्याने प्रवेश केला. या ठिकाणी राहत असलेल्या डॉक्टर सुशील अहिरे यांच्या घराच्या गेटमधून या बिबट्याने प्रवेश करत थेट बेडरूम मध्ये एन्ट्री केली. बिबट्या घरात घुसल्याने कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मॅक्स नावाच्या कुत्र्याला या बिबट्याची चाहूल लागली आणि त्याने भुंकायला सुरुवात केली. त्यानंतर डॉ. सुशील यांनी बेडरूम मध्ये बघितले असता,त्यांना थेट बिबट्याचे दर्शन झाले संपूर्ण परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन डॉ . आहिरे यांनी बेडरूमचा दरवाजा लावून घेतला आणि तातडीने ही बाब वन विभागाला कळवली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. ही संपूर्ण परिस्थिती डॉक्टर सुशील अहिरे यांच्या पत्नी प्रतिभा अहिरे यांनी कथन केलीये.
गोविंद नगर परिसरात असलेल्या अशोक प्राइड बिल्डिंग मध्ये बिबट्याने प्रवेश केल्यानंतर अहिरे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने या बिबट्याला आपल्या घराच्या किचनच्या खिडकीतून बघितले. मात्र, त्यांना भास झाल्याचे वाटले. परंतू त्यांना कुत्र वाटलं आणि कुत्र्याची उंची एवढी नसते असे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घराबाहेर असलेल्या सासूबाईंना घरात घेतलं. गेट बंद असल्याने बिबट्याने त्यांच्या घरात न येता त्यांच्या शेजारी असलेल्या अहिरे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या घरात असलेल्या कुत्र्याच्या वासामुळे हा बिबट्या त्यांच्या घरात गेला असावा असा अंदाज अनुराधा मेढे या प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केलाय.
डॉक्टर सुशील अहिरे यांच्या घरात बिबट्या घुसल्याची माहिती वन विभागाला कळाली आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू व्हॅन गोविंद नगर परिसरातील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बिबट्या बेडरूममध्ये असल्याने रेस्क्यू करणे वन विभागाला आव्हानात्मक झाले होते अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुशील यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील बाहेरची खिडकी फोडून बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टर सुशील आहिरे यांच्या घरात शिरलेल्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. बेडरूम मध्ये शिरलेला बिबट्या रेस्क्यू करणे हेदेखील आव्हान असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलय.
आज सकाळच्या सुमारास नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या सावता नगर आणि त्यानंतर गोविंद नगर परिसरात बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. अखेर या दोन्ही बिबट्यांना जेर बंद करण्यात वन विभागांच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
Read Latest Maharashtra News And Marathi News