• Wed. Mar 18th, 2026
    Pune Crime : शिरूरमध्ये मुलाकडून वृद्ध आईला अमानुष मारहाण, जमिनीच्या वादात माणुसकी हरली

    जमिनीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना शिरूरमधील वढू बुद्रुकमध्ये घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्यानंतर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट आहे.

    जमिनीच्या वादातून शिरूरमध्ये वृद्ध आईला मुलाकडून अमानुष मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे: ज्या हातांनी आधार द्यायला हवा होता, त्याच हातांनी वृद्ध आईवर घाव घातले. ज्या मुलाला लहानाचं मोठं करताना स्वतःच्या सुखाचा त्याग केला, त्याच मुलाने जमिनीच्या वादातून माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. पुण्यातील शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुकमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, नात्यांमधील ओलावा हरवत चालल्याची दाहक वास्तव समोर आले आहे.

    “आई” हे नाव काढताच डोळ्यासमोर मायेचा पदर येतो, पण वढू बुद्रुकमधील या घटनेत मायेवर स्वार्थाचा विजय झाला. मालमत्तेच्या वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून या कुटुंबात कलह सुरू होता. वृद्ध आई केवळ आपल्या हक्काच्या जमिनीची मागणी करत होती. मात्र, सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यावर मालमत्तेची अशी काही पट्टी बांधली गेली होती की, त्यांना आपल्या समोर उभी असलेली एक वृद्ध, असहाय स्त्री दिसलीच नाही.

    संतापजनक घटनाक्रम

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी या वादाने रौद्र रूप धारण केले. घरात सुरू असलेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. रागाच्या भरात विवेक गमावलेल्या सावत्र मुलाने आपल्या वृद्ध आईला केसांनी ओढत घराबाहेर काढले. डोळ्यात रक्ताची छटा आणि मनात मालमत्तेचा लोभ असलेल्या या मुलाने आईला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, घरातील इतर सदस्यांनी या मुलाला रोखण्याऐवजी स्वतःही या क्रूर कृत्यात सहभाग घेतला. हातातील काठ्यांनी वृद्ध महिलेला अमानुषपणे झोडपून काढण्यात आले.

    Maharashtra TimesMahad Chavdar Tale : महाडच्या चवदार तळ्यासाठी 55.80 कोटींचा प्रकल्प, शताब्दी वर्षात कायापालट होणार, खासदार सुनील तटकरे भूमिपूजन करणार

    परिसरात संताप

    रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्या अंगावरील जखमा या केवळ शारीरिक नसून, त्या विश्वासाला गेलेल्या तडा आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “आईवर हात उचलताना या नराधमांना थोडीही दया कशी आली नाही?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

    पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या एका तुकड्यासाठी जन्मदात्रीच्या नात्याला पायदळी तुडवणाऱ्या या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा