म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : यारी रोड ते अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. वेगवान प्रवासासाठी मुंबई महापालिकेने या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून ४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याची बोलीपूर्व बैठक २८ नोव्हेंबरला घेण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गावर साधारण ३५ मिनिटांचा लागणारा वेळ अवघ्या १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. जवळपास दोन दशकांनंतर या पुलाचा प्रश्न मार्गी लागला असून त्यामुळे परिसरातील वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
अंधेरी पश्चिममधील अमरनाथ टॉवरजवळील यारी रोड ते अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्सदरम्यान वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आणि २००२ मध्ये पहिल्यांदा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र प्रकल्पात येणाऱ्या खारफुटी, अन्य झाडांमुळे स्थानिकांकडून याला तीव्र विरोध केला जात होता. या पुलासाठी २०१४ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली, त्यावेळी प्रकल्पाची किंमत १६ कोटी रुपये होती. या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्तीही केली. मात्र स्थानिकांनी त्यावेळीही विरोध दर्शविला आणि पालिकेच्या या प्रकल्पाविरोधात न्यायालयात आव्हान दिले होते.

प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावाही केला होता. त्यामुळे काम सुरू होण्याआधीच पुलाची रखडपट्टी सुरू झाली. मात्र न्यायालयाने पूल बांधण्याचा मार्ग मोकळा केल्याने मुंबई महापालिकेने या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या किंमतीत काम करण्यास आधीच्या कंत्राटदाराने नकार दिल्याने प्रकल्पासाठी नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. मात्र पुलाच्या खर्चात वाढही झाली आहे. ४२ कोटी १० लाख रुपये पूल उभारणीसाठी खर्च येणार असून १८ महिन्यांत उभारण्याचे उद्दिष्ट कंत्राटदाराला देण्यात येणार आहे.