राजकीय दृष्ट्या कितीही मतभेद झाले तरी दिवाळी सणाला पवार कुटुंब एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच दिवाळी उत्सव साजरा होत आहे. मात्र राजकीय चर्चेला कोणतेही मुद्दे मिळू नये याची पुरेपूर काळजी पवार कुटुंबाने घेतल्याचे मागील काही दिवसांच्या त्यांच्या वर्तनावरून दिसून येते.
बारामती येथे काल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पक्षीय फूट व अजित पवार गटाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. या दिवाळी उत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील थेट माध्यमांसमोर येणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंब एकत्र येणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. मात्र, आज भाऊबीज सणानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पवार कुटुंबातील विविध सदस्य दाखल झाले आहेत.
अजित पवार काल सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह गोविंद बागेत दाखल झाले होते. त्यापूर्वी अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची प्रतापराव पवार यांच्या घरी देखील भेट झाली होती. या भेटीनंतर अजित पवार अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती.
Read Latest Maharashtra News And Marathi News