• Mon. Nov 25th, 2024
    तीन दिवसांआधी शरद पवारांची भेट घेतली पण ‘गोविंदबागे’तील पाडव्याला अजित पवार गैरहजर!

    बारामती पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीत मंगळवारी आयोजित केलेल्या दिवाळी पाडवा कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. शरद पवार हे दरवर्षी त्यांच्या गोंविंदबाग येथील निवासस्थानी पाडवा साजरा करतात. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बारामतीत येतात. मंगळवारीही मोठी गर्दी उसळली होती.

    यावेळी त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. अजित पवार काकांची भेट घेणार का, पाडव्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता खा. सुळे म्हणाल्या, अजितदादा गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूने आजारी आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम करीत आहेत. रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेमुळे बीडमध्ये आहेत. त्यामुळे तेही अनुपस्थित आहेत.

    विशेष म्हणजे शुक्रवारी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. ही राजकीय भेट नव्हती, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. ‘राजकारण आणि वैयक्तिक संबंध या वेगवेगळ्या गोष्टी आहेत’, असे खा. सुळे म्हणाल्या होत्या. दरम्यान, अजित पवार यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

    ‘कधीच जातीचे राजकारण केले नाही’

    मला माझी जात लपवायची नाही. कधीही जातीचे राजकरण केले नाही. साऱ्या जगाला माझी जात ठाऊक आहे. ओबीसी समाजाविषयी आस्था आहे आणि या समाजाचे समाधान होईल यादृष्टीने हरतऱ्हेने प्रयत्न करेन, असे शरद पवार मंगळवारी म्हणाले. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी युवांची भावना तीव्र आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारकडे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed