MVA Manifesto for Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे.
महायुतीचा पराभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. राज्यात स्थिरता आणि सुशासन आणण्यासाठी मविआला मतदान करण्याचं आवाहन खरगेंनी केलं. ‘राज्याच्या प्रगती आणि विकासासाठी आमच्याकडे पंचसुत्री आहे. शेती, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहर विकास, पर्यावरण, जनकल्याणावर आमचा भर आहे,’ असं खरगे म्हणाले.
आम्ही देत असलेल्या पाच गॅरंटी कुटुंबाच्या प्रगतीत महत्त्वाच्या ठरतील. यामुळे एका कुटुंबाला दरवर्षाला ३.५ लाख रुपयांचा लाभ होईल, असं खरगेंनी सांगितलं. महायुतीच्या लाडकी बहिण योजनेला महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतून गरजू महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. तीच रक्कम २१०० रुपये करण्याचं आश्वासन भाजपकडून दिलं जात असताना मविआनं ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर बेरोजगार तरुणांनादेखील आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या घोषणापत्रात काय काय?
१. महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना ३ हजार रुपये प्रति महिना देणार.
२. जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय
३. तमिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणार
४. महिलांना मोफत बस प्रवास सेवा
५. बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये देणार
६. कर्जाचं व्याज वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणार
७. २५ लाखांची आरोग्य विमा योजना सुरु करणार
८. मोफत औषधं उपलब्ध करुन देणार
९. २.५ लाख नोकरभरती करणार
१०. ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत देणार