• Mon. Nov 25th, 2024
    माहीम मोहीम फिस्कटली; पण राज, शिंदेची मोक्याच्या मतदारसंघात गट्टी; ठाकरेंचा शिलेदार अडचणीत?

    Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत माहीमच्या जागेवरुन बरंच राजकारण रंगलं. यामुळे शिंदेसेना आणि मनसेचे संबंध काही प्रमाणात ताणले गेले. पण आता त्यात सुधारणा होताना दिसत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघावरुन रंगलेलं राजकारण संपूर्ण राज्यानं पाहिलं. शिंदेसेनेनं माहीममधून माघार घेत मनसेसाठी मार्ग सोपा करावा, यासाठी भाजपनं बराच दबाव आणला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहीमची जागा काही सोडली नाही. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित यांची वाट बिकट आहे. माहीम मोहीम अडचणीत आल्यानंतर राज ठाकरेंची शिंदेंबद्दलची भाषा अचानक बदलली. त्यांनी पक्ष, चिन्हावरुन शिंदेंना सणसणीत टोले लगावले. पण आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची जवळीक पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भायखळा विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेला छुपा पाठिंबा दिला आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या मतदारसंघात मनसेनं उमेदवार दिलेला नाही. पण त्यांनी शिवसेना उबाठाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्याविरोधात प्रचार सुरु केलेला आहे. मनसेचे पदाधिकारी शिंदेसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. मनसेचा फायदा जाधव यांना होऊ शकतो.
    Amit Shah: आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर…; अमित शहांचं सूचक विधान
    लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची जागा यामिनी जाधव यांनी लढवली होती. त्या शिंदेसेनेच्या उमेदवार होत्या. शिवसेना उबाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी जाधव यांचा ५२ हजार ६७३ मतांनी पराभव केला. या पराभवात भायखळ्यात सावंत यांना मिळालेली आघाडी निर्णायक ठरली. जाधव भायखळ्यात तब्बल ४६ हजार मतांनी पिछाडीवर होत्या. विशेष म्हणजे जाधव स्वत: भायखळ्याच्या आमदार आहे. पण आपल्याच मतदारसंघात त्या पिछाडीवर पडल्या.
    MVA Manifesto: महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय?
    भायखळ्यात मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ठाकरेसेनेच्या जामसुतकर यांचं पारडं जड मानलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव मतांच्या विभाजनामुळे निवडून आल्या. एमआयएमचे वारिस पठाण आणि काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्यात झालेल्या मत विभाजनाचा फायदा जाधव यांना झाला होता.

    Maharashtra Election: माहीम मोहीम फिस्कटली; पण राज, शिंदेची मोक्याच्या मतदारसंघात गट्टी; ठाकरेंचा शिलेदार अडचणीत?

    २०१९ मध्ये विधानसभेला ५१ हजार १८० मतं घेणाऱ्या जाधव यांना नुकत्याच झालेल्या लोकसभेत भायखळ्यातून ४० हजार ८१७ मतदान झालं आहे. तर याच मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरेसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी तब्बल ८६ हजार ८८३ मतं घेतली. त्यामुळे आता जाधव यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. मनसेचा छुपा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे. तो किती उपयोगी ठरणार याचं उत्तर २३ नोव्हेंबरला मिळेल.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed