सतत चौथ्या वर्षी दिवाळीनिमित्त भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे कायापालट उपक्रम घेण्यात आला. भाजपा, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने कायापालट उपक्रम दर महिन्यात राबविण्यात येतो. या निराधारांना सिद्धेश्वर मंदिर परिसर, गोवर्धनघाट येथे आणून त्यांची कटिंग दाढी करण्यात आली. त्यानंतर सुगंधी उटणं लावून सर्वांची मोती साबणाने येथेच्छ आंघोळ घालण्यात आली.
त्यानंतर सर्वांना नवीन पँट, शर्ट, अंडर पँट, बनियन इत्यादी कपडे आणि शंभर रुपये दिवाळी बक्षीसी देण्यात आली. यावेळी महिलांकडून सर्व निराधारांना औक्षण देखील करण्यात आले. दरम्यान निराधारांच्या हस्ते सुरसुरी, अनार, भूईनले, लड तसेच इतर फटाके वाजविण्यात आले. सर्वांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. हा आगळावेगळा कौतुक सोहळा पाहून अनेकजण गहिवरून गेले होते. दिलीप ठाकूर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
दरम्यान डॉ. दि. बा. जोशी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केले. चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया यांच्या सह इतरांनी सिद्धेश्वर बाबा शिवमंदिरचा परिसर झाडून स्वच्छ केले. ॲड. बी. एच. निरणे यांनी सर्वांना सीताफळे वाटण्यात आली. सुरेश लोट, पोस्ट अल्पबचत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिवलाड, साहेबराव गायकवाड, शिवा लोट यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.