• Sat. Sep 21st, 2024

गुन्ह्यात मदत करतो म्हणत मागितली लाच, मिळाल्या खेळण्यातील नोटा, दोन पोलिसांवर ACB चा हथोडा

गुन्ह्यात मदत करतो म्हणत मागितली लाच, मिळाल्या खेळण्यातील नोटा, दोन पोलिसांवर ACB चा हथोडा

सोलापूर: पाडव्याच्या आदल्यादिवशीच सोलापुरात अॅन्टी करप्शनची कारवाई झाली आहे. झिरो पोलीसासह एका हवालदारावर कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कलम न वाढवणे, अटक करून टेबल जामीन देणे व न्यायालयात पोलीस कोठडी न मागण्यासाठी 30 हजार रूपये लाचेची मागणी करून मध्यस्थामार्फत दहा हजार रुपये मुलांच्या खेळण्यातील नोटांसह लाच स्वीकारताना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदारावर गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदार प्रमोद कांबळे व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्यासह कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबतचा तपास आरोपी लोकसेवक हवालदार प्रमोद कांबळे यांच्याकडे होता. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रमोद कांबळे यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यामध्ये तक्रारदार यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांना कलम ३२६ न वाढवता व या गुन्ह्यात अटक केल्यानंतर टेबल जामीन देणे व पोलीस कोठडी न मागण्याच्या अटीवर हि लाच मागितली.

मराठा तरुणांच्या भावना तीव्र, दुर्लक्ष करुन चालणार नाही, आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा: शरद पवार

पोलीस ठाण्याच्या मुतारीत लाच स्वीकारली

तडजोडीअंती वीस हजार देण्याचे ठरले व पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये झिरो पोलीस नागा उर्फ नागनाथ काळूराम अलकुंटे याच्याकडे देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे झिरो पोलीस नागा हा पोलीस ठाण्याच्या मुतारीत थांबला होता. नागा अलकुंटे याने मुतारीत तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले. 10 हजार रुपये दिल्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना इशारा केला. यावेळी अलकुंटे याने पोलीस हवालदार प्रमोद कांबळे याला फोन करून लाच स्वीकारल्याची माहिती दिली.

पाच हजार रुपयांच्या खेळण्यातील नोटा

लाचलुचपत पोलिसांनी हा ट्रॅप लावताना पाच हजार रुपये किमतीच्या खऱ्या नोटा व पाच हजाराच्या मुलांच्या खेळण्यातील नोटा तक्रारदाराकडे दिल्या होत्या. त्या नोटा झिरो पोलीस अलकुंटेमार्फत स्वीकारताना पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी या दोन्ही आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याने आरोपींना बेड्या घालायला हव्या होत्या पण त्याच तपास अधिकाऱ्यालाच बेड्या पडल्याने सोलापुरात चर्चेचा विषय झाला आहे.

सोलापूरचा खासदार चोरीला गेला, खासदार सिद्धेश्वर महाराज बेपत्ता; ठाकरे गटाकडून आंदोलन

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed