राज्यातील सर्व गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा दिला जात आहे. शंभर रुपयांमध्ये साखर, एक किलो, पामतेल एक लिटर आणि रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे प्रत्येकी अर्धा किलो अशा सहा वस्तू आहेत. शहरात सातशेहून अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत. शहराच्या विविध भागात ऐन दिवाळीत आनंदाच्या शिधाच्या रुपाने सहा वस्तू अद्याप मिळाल्या नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. काही भागांमध्ये चार वस्तू मिळाल्या तर काही भागात तीन वस्तू मिळाल्याचे रेशन दुकानदार सांगत आहेत. तर अन्न धान्य वितरण विभागाकडून सर्व वस्तू रेशन विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्य़ात आल्या असल्या तरी एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाल्या नसल्याचे विक्रेते सांगत आहे. त्याबाबत तक्रारी करीत आहेत.
काही भागात गोदामांमध्ये संपूर्ण सहा वस्तू पोहोचल्या आहेत. मात्र, दिवाळी सुरू असूनही अनेकांना आनंदाचा शिधा रेशन दुकानात उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ग्राहका नाराजी व्यक्त करीत आहेत. शहरातील सुमारे सव्वातीन लाख कार्डधारकांना तर जिल्ह्यातील सुमारे पावणेसहा लाख कार्डधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.
पुणे शहरात सिंहगड रोड, धायरी, कोथरुड, खिलारवाडी या भागात आनंदाचा शिधा पोहोचला नाही. तसेच अन्य भागात माल पोहोचला नाही. अन्न पुरवठा विभागाकडून व्यवस्थित नियोजन केले नसल्याने ऐन दिवाळीत लाभार्थ्यांना शिधा वेळेत संपूर्ण किट्समध्ये उपलब्ध होऊ शकला नाही. काही ठिकाणी रवा, तेल बाकी तर काही ठिकाणी मैदा वस्तू अद्याप बाकी आहे, असे विक्रेते सांगत आहेत.
दरम्यान, पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर म्हणाल्या, ‘जिल्ह्यातील पावणेसहा लाख लाभार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के लाभार्थ्यांपर्यंत ग्रामीण भागात आनंदाचा शिधा पोहोचला आहे. संपूर्ण सहा वस्तू लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत २० टक्के लाभार्थ्यांपर्यंत शिधा पोहोचेल.’
या संदर्भात शहर अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांच्याशी संपर्क साधला असता मात्र तो होऊ शकला नाही.
कोट
शहरातील लाभार्थ्यांना दिवाळीचा आनंदाचा शिधा अद्याप पूर्णत: पोहोचला नाही. काही भागांमध्ये काही ठिकाणी दोन, तीन किंवा चार वस्तू पोहोचल्या आहेत. जोपर्यंत सहा वस्तू पूर्ण मिळत नाही तोपर्यंत ई पॉस मशीनकडून स्वीकारल्याचे दाखविले जात नाही. त्यामुळे तांत्रिक अडचण येत आहे.
गणेश डांगी, अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना