दुर्देवानं महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये दिवाळीचे फटाके फुटत आहेत. दिवाळीतच दोन नेत्यांमध्ये शिमगा बघायला मिळत आहे. गजानन कीर्तिकर ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं वय ८० ते ८५ झालंय , त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलून चर्चा करायला हवी. मला वाटतंय त्यांचं वय जास्त झालंय, ते भ्रमिष्ठ झाले असावेत, त्यांना डॉक्टरांकडे जायला हवं. कोणताही ज्येष्ठ नेता आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात प्रसिद्धीपत्रक काढत नसतो, असं कदम म्हणाले.
१९९० सालामध्ये पाडण्याचा प्रयत्न झाल्याचं ते म्हणाले. १९९० मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून उमेदवारी दिली होती. खेडमध्ये मी उमेदवार असताना यांना पाडायला कधी आलो. कांदिवलीत मी शाखाप्रमुख असल्यानं मी केलेल्या कामावर ते निवडून आले आहेत. किती बेईमानी गजानन कीर्तिकर यांच्याकडे आहे हे दिसून येत आहे. मला बदनाम करण्यासाठी, महाराष्ट्रात प्रतिमा डागाळण्यासाठी ते प्रसिद्धीपत्रक काढत आहेत याचा मी निषेध करतो, असं रामदास कदम यांनी म्हटलं.
अनंत गिते यांनी २००९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन मला गुहागरमध्ये पाडलं. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं की गितेंचं काम करणार नाही. आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी पक्षासोबत गद्दारीचं काम गजानन कीर्तिकर करत आहेत. शरद पवारांना भेटल्याचा आरोप करत आहेत त्यांना स्वप्न पडलं असावं, असं कदम म्हणाले.
गजानन कीर्तिकर यांनी प्रेसनोट काढली होती. मी काय वाईट बोललो होतो, गजानन कीर्तिकर यांना काय झोंबलं आहे. समोरच्याला दोषी ठरवायचं हे काम गजानन कीर्तिकर यांनी केलं. नारायण राणे पक्ष सोडून गेला तेव्हा रामदास कदम लढत होता, इतरांनी शेपटं घातली होती, असा हल्लाबोल कदम यांनी केला.
बेईमानी आणि गद्दारी तुमच्या मुलासाठी करत आहात. मुलगा उद्धव ठाकरेंकडून लढणार, तुम्ही इकडून लढणार आणि घरी बसणार आणि मुलाला बिनविरोध निवडून आणणार हे दुनियेला कळत नाही का असा सवाल रामदास कदम यांनी केला. मी ज्येष्ठ नेते म्हणून इज्जत ठेवतोय, पक्षाचं वातावरण मी बिघडवत नाही, ते बिघडवत आहेत, असं रामदास कदम म्हणाले. गजानन कीर्तिकर पुत्र प्रेमापोटी टोकाला पोहोचलेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News