• Mon. Nov 25th, 2024

    कामा रुग्णालयात आता दुसरं मियावाकी जंगल; ७ हजार चौरस फुटांवर १५०० झाडं लावली जाणार

    कामा रुग्णालयात आता दुसरं मियावाकी जंगल; ७ हजार चौरस फुटांवर १५०० झाडं लावली जाणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

    मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी विविध यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कामा रुग्णालयात आता दुसऱ्यांदा मियावाकी जंगल फुलवण्यात येणार आहे. कामा रुग्णालयाच्या आवारामध्ये सात हजार चौरस फूट जागेवर मियावाकी जंगल साकारण्यात येणार असून, त्यात विविध प्रकारची १५०० झाडे लावण्यात येणार आहेत. याआधीही कामा रुग्णालयात मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली होती.

    हे मियावाकी जंगल ‘ग्लेनमार्क फाऊंडेशन’च्या माध्यमातून तयार करण्यात येणार असून, यामध्ये अडुळसा, आवळा, दालचिनी, हिरडा, बदाम, फणस, कडीपत्ता, आंबा, कोकम, नागचाफा, करवंद, पिंपळ, शमी, सीता अशोक, सोनचाफा, सुपारी, तेजपत्ता, वड, रिठा, पारिजात, निरगुंडी आदी ४५ प्रजातींची १५०० देशी आणि आयुर्वेदिक गुण असलेली झाडे लावण्यात येणार आहेत.

    सात हजार चौ. फुटात जंगल
    मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना करण्याबरोबरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र, प्रदूषण रोखण्यामध्ये झाडांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात दुसरे मियावाकी जंगल तयार करण्यात येणार आहे. हे जंगल सात हजार चौ. फूट जागेवर उभारण्यात येणार आहे. झाडांची निगा राखणे, त्यांना खते घालणे यांसह दिवसांतून दोनवेळा ठिबकसिंचन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. झाडांना घालण्यात येणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी या झाडांभोवती प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे.

    यापूर्वी सात हजार झाडे
    कामा रुग्णालयामध्येच यापूर्वी २०२२मध्ये १५ हजार चौ. फूट जागेवर मियावाकी पद्धतीने जंगल साकारण्यात आले होते. त्यावेळी ७,०२६ झाडे लावण्यात आली होती. मियावाकी जंगलात जैवविविधतता राखण्यासाठी विविध प्रकारच्या झाडांचा यात समावेश करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *