दिवाळीच्या मुहूर्तावर आफ्रिकेतील मलावी येथील हापूस आंबे शनिवारी घाऊक बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजारात शनिवारी आंब्यांचा सुगंध दरवळला. कोकणचा हापूस अजून बाजारात आलेला नाही. मात्र, या मलावी हापूस आंब्याने बाजारात बाजी मारली आहे.
या परदेशी आंब्याचे ५९८ खोके शनिवारी घाऊक फळ बाजारात आले आहेत. प्रत्येक खोक्यामध्ये प्रतवारीनुसार १०, १२, १४, १६ आंबे आहेत. एका खोक्याला ४,५०० ते ५,५०० रुपयांचा दर मिळाला आहे. आंबे दाखल झाल्यावर हातोहात ते विकले गेल्याची माहिती संचालक संजय पानसरे यांनी दिली. दरवर्षी त्यांच्याकडे हे परदेशी आंबे बाजारात येतात. कोकणचे हापूस आंबे बाजारात यायला उशीर आहे. त्याआधीच हे आंबे आले आहेत. मात्र, हे आंबे कोकणच्या हापूससारखेच असल्याने, या आंब्याना चांगला दर मिळतो.
कोकणच्या हापूसची आफ्रिकेत लागवड
विशेष म्हणजे, हे आंबे म्हणजे कोकणच्या हापूस आंब्याची रोपे नेऊन तिथे लागवड केलेली झाडे आहेत. तिथले हवामान इथल्या आंब्याना पोषक असल्याने, हे आंबे अगदी हुबेहूब कोकणी हापूससारखे आहेत. त्यामुळे त्यांना इथल्या बाजारात चांगला दर मिळतो. या आंब्यांचा हंगाम २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या आंब्यांची चव चाखता येणार आहे, असे पानसरे यांनी सांगितले.
कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी
आंबे महाग असल्याने या आंब्यांना सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी नसते. कॉर्पोरेट क्षेत्रात या आंब्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे तिथेच आणि आत्ता दिवाळीत भेट म्हणून देण्यासाठी हे आंबे चांगला पर्याय ठरले आहेत.