यंदा ऊसाची लागवड आणि वाढ दोन्हीही कमी आहे. यामुळे राज्यातील साखर हंगाम किमान शंभर दिवस चालणेही अवघड आहे. दिडशे दिवस चालला तर तो परवडतो. पण, पन्नास दिवस हंगाम कमी होणार असल्याने ‘सारं कसं मॅनेज करायचं?’ या विचारात कारखानदार आहेत. मात्र, दुसरीकडे मागील हंगामाचे प्रति टन चारशे रूपये आणि नव्या हंगामात टनाला साडेतीन हजार दिल्याशिवाय कोयत्याला हात लावणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी आघाडीवर आहेत. यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आम्ही मागितलेला दर देणे कारखान्यांना कसा शक्य आहे, हे आम्ही दाखवून देतो. यामुळे नकारघंटा वाजविण्यापेक्षा शेतकऱ्यांचा हक्क त्यांना द्या, त्याशिवाय ऊसाच्या कांडक्यालाही हात लावू देणार नाही.
राजू शेट्टी, माजी खासदार
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. शेट्टी हे हातकणंगले मतदार संघातील उमेदवार असतील. प्रा. जालदंर पाटील कोल्हापूरातून इच्छूक आहेत. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची मशागत सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यांनी घेतला आहे. त्यांनी मागितलेला दर देणे सध्या तरी कठीण असल्याचे कारखानदारांचे मत आहे. यामुळे टनाला तीन हजार ते ३२०० पर्यंतच्या दराची घोषणा सुरू आहे. हे शेतकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी ऊसाची वाहने अडविण्यास सुरुवात केली आहे. तोडफोड, जाळपोळ सुरू आहे. यातून आंदोलन चांगलेच पेटले आहे.
सर्व कारखाने शेट्टी यांना साखर विक्रीचे रेकॉर्ड दाखविण्यास तयार आहेत. शेतकरी संघटनेने मागितलेला दर देणे कारखान्यांना शक्य नाही. यामुळे आंदोलन वाढवत राहून हंगाम आणखी अडचणीत आणू नये.
हसन मुश्रीफ, पालकमंत्री
या आंदोलनामुळे हंगाम लांबणीवर पडत आहे. याचा फायदा कर्नाटकातील सीमाभागातील कारखाने घेत आहेत. महाराष्ट्रातून ते ऊसाची पळवापळवी करत आहेत. याचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील कारखान्यावर होणार आहे. यामुळे तातडीने तोडगा काढून हंगाम गतीने सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापवायचे असल्याने ‘आता माघार नाही’ अशी भूमिका घेतली जात आहे. यातून यंदाचा साखर हंगाम कोडींत सापडण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News