• Mon. Nov 25th, 2024

    नाईलाजानं दूर राहावं लागणं त्रासदायक… अजितदादा दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबासोबत नसणार?

    नाईलाजानं दूर राहावं लागणं त्रासदायक… अजितदादा दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबासोबत नसणार?

    पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे अजितदादा काकांसोबत पाडवा साजरा करणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली होती. परंतु दादांच्या आजारपणामुळे हा पेच आपसूकच सुटला आहे.

    डेंग्यूमुळे प्रकृती खालावल्यापासून अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. त्यामुळे दिवाळीतही अजितदादा आराम करणार असून गाठीभेटी घेणं टाळणार आहेत. ‘एक्स’वरुन अजित पवार यांनी याविषयी सूतोवाच केले. त्यामुळे अजितदादा पवार कुटुंबीयांची भेट घेणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु आराम आणि विश्रांती घेण्याच्या अजितदादांच्या विधानातून तसे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

    भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही

    अजित पवार काय म्हणाले?

    “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे.”

    पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अजितदादांचंच वर्चस्व, संचालकपदी विश्वासू मोहरा
    “दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.” असे सांगून त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed