सिद्धेश सत्यवान बर्गे ( वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. आत्महत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. सिद्धेश हा गॅस रिपेरिंगचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आळंदी परिसरातील चिंबळी येथे सिद्धेश हा वास्तव्यास होता. त्याने मराठा आरक्षण मिळावे म्हणून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर त्याच्या जवळ एक चिठ्ठी देखील सापडली आहे. त्या चिठ्ठीत ”मी माझ्या जीव कोणाच्या त्रासाला कंटाळून देत नाही. या सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून देत आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे. त्यामुळे मी माझा जीव देत आहे. कोणीही कोणाला दोष देऊ नये मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे”, असे लिहले असून ”शेवटी फक्त माझ्या सोन्या, आप्पा, जिजी, आईला सांभाळा”, असे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
काल शुक्रवारी रात्री त्याने दुकानाचे शटर बंद करून हे कृत्य केलं आहे. सिद्धेश हा अनेक दिवसांपासून मराठा आंदोलनात सहभागी होता. मात्, मुलाच्या या कृतीने कुटुंबीय पुरते हादरून गेले आहे. ”आमच्या मुलाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या केली असून आम्हाला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. कुठल्याही मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये”, असे आवाहन बर्गे कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.