• Sat. Sep 21st, 2024

कामातून जितकं कमवायचा त्याहून अधिक सुट्टीत लुटायचा; नेरुळमधील मजुराचा कारनामा ऐकून पोलीसही हादरले

कामातून जितकं कमवायचा त्याहून अधिक सुट्टीत लुटायचा; नेरुळमधील मजुराचा कारनामा ऐकून पोलीसही हादरले

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नेरूळ परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोराला नेरूळ पोलिसांनी शिताफीने अटक केली. नितीशकुमार दास (२४) असे या चोराचे नाव असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून सलग चार महिने या आरोपीवर दिवस-रात्र पाळत ठेवून त्याला उलवे परिसरातून अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्याने नेरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यातील १० लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी नितीशकुमार दास हा मजूर म्हणून काम करत होता. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर तो गावठाणात फिरून कुलूपबंद असलेल्या घरांचा शोध घेऊन त्या घरात चोरी करत असे. अशा पद्धतीने या चोराने गेल्या १० महिन्यांमध्ये नेरूळ भागात दिवसा १२ घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरला होता. नेरूळ भागात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे, नीलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सलग चार महिने आरोपी नितीशकुमार ये-जा करत असलेल्या मार्गावर दिवस-रात्र पाळत ठेवली. त्यानंतर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा माग काढला असता, तो उलवे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला २२ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. त्याने घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करुन त्याच्याकडून सोने, लॅपटॉप, हार्डडिस्क तसेच चोरीचे दागिने विकून घेतलेली मोटारसायकल असा एकूण १० लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सोलापूरात पुन्हा नशेचे गोदाम उद्ध्वस्त; कोट्यवधींचा माल जप्त, नाशिक पोलिसांची कारवाई
चोरीच्या ऐवजाची बिहारमध्ये विक्री

आरोपी नितीशकुमार हा घरफोडी केल्यानंतर चोरीचा ऐवज घेऊन मूळ गावी बिहारमधील दरभंगा येथे पळून जात होता. त्यानंतर तेथे चोरलेल्या सामानांची विक्री करून मिळालेल्या पैशांतून आपल्या मित्रांसोबत पार्टी करून मौजमजा करत होता. तसेच, काही मुद्देमाल त्याने त्याचा मित्र सुंदरकुमार याच्याकडे दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी सुंदरकुमार याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed