• Sat. Sep 21st, 2024

मुंब्य्रातील शिवसेना शाखा कुणाची? पदाधिकाऱ्यांत वाद, शिंदे गटाकडून ठाकरेंची शाखा जमीनदोस्त

मुंब्य्रातील शिवसेना शाखा कुणाची? पदाधिकाऱ्यांत वाद, शिंदे गटाकडून ठाकरेंची शाखा जमीनदोस्त

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाण्यातील शाखांवरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नसून मुंब्र्यात पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. मुंब्य्रातील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेत बुलडोझरने पूर्णपणे जमीनदोस्त केली. या शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी गैरकारभार करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर शिंदे गटाला या शाखेच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे उभारायचे असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शाखा ताब्यात घेण्याच्या वादातून ठाण्यात पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मागील दीड वर्षात ठाण्यात विविध विभागांतील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरे गटामध्ये वादाचा अंक रंगला आहे. गुरुवारी दुपारी ठाकरे गटाचे मुंब्रा शहरप्रमुख विजय कदम आणि काही पदाधिकारी शाखेत बसले असताना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे हे त्यांच्या समर्थकांसह या शाखेत आले. त्यांनी या शाखेचा ताबा घेतला. त्यानंतर रात्री ही शाखा बुलडोजरने जमीनदोस्तही करण्यात आली.

अजितदादांना भाजपच बालेकिल्ल्यात घेरणार, काटेवाडी ग्रामपंचायतीत दादा गटासमोर भाजप

या शाखेच्या आजूबाजूला अनधिकृत पद्धतीने व्यावसायिक वापरासाठी जागा देण्यात आली होती, असा आरोप राजन किणे यांनी केला. याठिकाणी कोणीही येऊन नागरिकांच्या हक्कासाठी काम करत नव्हते, वर्षातून केवळ दोनवेळा शाखा उघडली जात असल्याचेही किणे म्हणाले. त्यामुळेच ही शाखा पाडून येत्या दोन दिवसांत नव्याने शाखा उभारण्याचे काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुरुवातीला शिवसेनेत असलेले राजन किणे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ‘मुंब्रा विकास आघाडी’चा प्रयोग केला. सध्या ते शिंदे गटात काम करत असल्याने या वादाबाबत ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.

सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार, वर्षावर आमदार-खासदारांची बैठक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed