• Mon. Nov 25th, 2024

    खारे-गोडे पाणी प्रकल्पाची मुंबईला खरंच गरज आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध जलतज्ज्ञांचं मत

    खारे-गोडे पाणी प्रकल्पाची मुंबईला खरंच गरज आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध जलतज्ज्ञांचं मत

    मुंबई : मुंबई ही कोकणपट्ट्यात असून या भागावर वरूणराजाची कृपादृष्टी आहे. मुंबई आणि महानगर प्रदेश हा उल्हास नदीच्या खोऱ्यात येतो. या खोऱ्यात पर्जन्यमान उत्तम आहे. त्यामुळे या खोऱ्यातील पावसाचे पाणी साठवून महानगर प्रदेशाचा विकास करणे शक्य आहे. हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची मुंबईला बिलकूल गरज नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केली.

    मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाल्यास पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. त्यामुळे पालिकेला पाणीकपात करावी लागते. परिणामी मुंबईच्या विविध भागातून पाण्याच्या तक्रारी सुरू होतात. पाणीटंचाईच्या काळात पाण्याची कमतरता भासू नये तसेच काही प्रमाणात पर्यायी व्यवस्था म्हणून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पालिकेने आखला आहे. बोरिवली पश्चिम येथील मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. दररोज ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटरचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत विविध करांसह सुमारे १३ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

    हजारो कोटी रुपये खर्च करून मुंबईला अशा प्रकल्पाची गरज आहे का, यावरून चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जलतज्ज्ञ डॉ. चितळे यांनी मुंबई आणि विदेशातील पर्जन्यमान, तंत्रज्ञान, नागरिकांची गरज अशा विविध मुद्द्यांवर परखड मते व्यक्त केली आहेत. ‘समुद्राचे खारे पाणी हे उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करून गोडे केले जाते. वेगवेगळ्या कारणांमुळे ऊर्जा दिवसेंदिवस महाग होत जात असून भविष्यातही महागणार आहे. परिणामी पाणी गोडे करणे महागात पडणार आहे. उल्हास खोऱ्याचा विकास करण्याचा माझा आराखडा राज्य सरकारकडे आहे. या आराखड्यानुसार विकास केल्यास महानगर प्रदेशात सिंचनाचा विस्तार, मुंबईची पाण्याची गरज आणि मुंबईचा औद्योगिक विकास या तीनही गोष्टी साध्य होतील,’ असे डॉ. चितळे म्हणाले.

    ‘मुंबईला पाण्याची गरज आहे, हे नाकारून चालणार नाही. मात्र उल्हास खोऱ्यातील पावसाचे प्रमाण पाहता दीर्घकाळ मुंबईत पाणीटंचाईची भीती नाही. सुदैवाने मुंबईला निसर्ग अनुकूल आहे. मात्र येथे असलेल्या पर्जन्यमानाचा योग्य वापर होत नाही. याचा विचार करूनच प्रकल्प उभारायला हवेत. उगीच खोटे दुखणे अंगावर घेण्यात काय अर्थ आहे,’ असा प्रश्न त्यांनी केला.

    ‘मुंबई हे बेट आहे. या शहराने लोकसंख्येची मर्यादा कधीच ओलांडली आहे. पायाभूत सुविधा वाढतील तितकी लोकसंख्येत भर पडत जाणार आहे. त्यामुळे या बेटावर अधिक गर्दी करण्याची गरज आहे का? मुंबईचा आधी सामाजिक दृष्टीने विचार करायला हवा. केवळ एखाद्या तंत्रज्ञानाने प्रकल्प उभारता येतो म्हणून तो उभारणे म्हणजे तंत्रज्ञानाचा कसाही वापर करून त्याचा खेळ करणे योग्य होणार नाही. सर्वांत आधी मुंबईचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे. कितीही पैसा लागला तरी बाहेरून पाणी आणून किंवा खारे पाणी गोड करून मुंबईला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता नाही. मुंबईपासून जवळच कोकणात किंवा महाराष्ट्रात अनेक भागात पुष्कळ जमीन उपलब्ध आहे. तिथे भरपूर पाणी आहे. त्याचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तरी मुंबईकरांसह त्या भागातील नागरिकांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध करू शकतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
    मुंबईतील गोडे पाणी पिण्याआधीच महाग; ३५०० कोटींचा प्रकल्प ८५०० कोटींच्या घरात
    या प्रकल्पात कुणाला ‘रस’ आहे?

    खारे पाणी गोडे करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो पैशांचा अपव्यय आहेच, शिवाय हा प्रकल्प आपल्याला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या न परवडणारा प्रकल्प आहे. मुळात या प्रकल्पात ‘रस’ कुणाला आहे, असा प्रश्न उपस्थित करत डॉ. चितळे यांनी सरकार अशा प्रकल्पांचा विचार तरी का करते, अशी विचारणा केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *