• Sat. Sep 21st, 2024

‘ब्लॅकस्पॉट’वर तात्पुरती मलमपट्टी; पुण्यातील ३४ ठिकाणांचा संयुक्त अहवाल पालिकेकडे सादर

‘ब्लॅकस्पॉट’वर तात्पुरती मलमपट्टी; पुण्यातील ३४ ठिकाणांचा संयुक्त अहवाल पालिकेकडे सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील महत्त्वाच्या ३४ ठिकाणच्या ‘ब्लॅकस्पॉट’च्या पाहणीनंतर तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उड्डाणपूल करणे, रस्ता रुंदीकरण आणि ‘अंडरपास’सारख्या कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे महापालिकेला अहवाल पाठवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे.

– अहवाल महापालिकेकडे सादर

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या ऑगस्टमधील बैठकीत जिल्ह्यातील ६३ ‘ब्लॅकस्पॉट’ची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. पुणे महापालिका, सार्जनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ६३ पैकी ३४ ठिकाणांना भेट दिली. त्याबाबतचा अहवाल पुणे महापालिका, ‘एनएचएआय’ला बांधकाम विभागाने पाठविला. अहवालानुसार, शहरात काही ठिकाणी तात्पुरत्या आणि काही ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या शिफारशी महापालिकेला केल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांनी सुचविलेल्या उपाययोजनांचीही दखल घेण्यात आली आहे.

– कायमस्वरूपी उपाययोजना काय?

उड्डाणपूल, ‘अंडरपास’, रस्ता रुंदीकरणाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेकडे निधी उपलब्ध होताच शिफारशींनिहाय कामे करण्याचे सुचविण्यात आले आहे. वैदूवाडी चौकात सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मुठा नदीच्या पुलाच्या नजीक सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे-सोलापूर रस्ता येथे मोठी वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. मुंढवा चौकात कायमस्वरूपी उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे. सीओईपी कॉलेज ते सीओईपी वसतिगृहादरम्यान ‘अंडरपास’ची शिफारस सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.

शहरातील महत्त्वाचे ‘ब्लॅकस्पॉट’

भारती विद्यापीठ रस्ता : दरी पूल, कात्रज चौक सातारा रस्ता, नवा कात्रज बोगदा.
सिंहगड रस्ता : नवले पूल, भूमकर पूल.
वारजे : मुठा नदी पूल, डुक्कर खिंड, माई मंगेशकर रुग्णालयाचा परिसर.
विमानतळ : विमाननगर चौक, खराडी दर्गा चौक, टाटा गार्ड रूम, खराडी जकात नाका, पठाणशाह बाबा दर्गा रस्ता, ५०९ चौक, रिलायन्स मार्ट.
शिवाजीनगर : संचेती चौक, खडकवासला.
चंदननगर : साईनाथनगर चौक, थिटे वस्ती पेट्रोल पंप, खराडी बायपास चौक.
कोंढवा : खडीमशिन चौक.
वाहतूक बदल बासनात! ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या बदलांचा उलटाच परिणाम
तात्पुरत्या उपाययोजना
– रम्बलर स्ट्रीप बसविणे.
– चौकांत सिग्नल उभारणे.
– दुभाजक बसविणे आणि रंगरंगोटी करणे.
– माहिती आणि दिशादर्शक फलक बसविणे.
– पथदिवे बसविणे
– क्रॅश बॅरिअर पेंटिंग, लेन मार्किंग करणे.
– स्पीड कॅमेरा बसविणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अन्य विभागांच्या मदतीने शहरातील अपघात ठिकाणांची संयुक्त पाहणी केली आहे. पाहणीनंतर शहरातील उपाययोजना आणि प्रस्तावित शिफारशींचा अहवाल महापालिकेकडे दिला आहे.- बप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed