• Mon. Nov 25th, 2024
    खासदार धैर्यशील माने हरवले; सकल मराठ्यांचा पोलीस ठाण्यावर शोध घेण्यासाठी मोर्चा

    गुरुबाळ माळी, कोल्हापूर : वर्ण गोरा…वाढलेली दाढी असे वर्णन लिहून मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केलेले खासदार धैर्यशील माने कोणाला आढळल्यास लवकरात लवकर मतदारसंघात त्यांची पाठवणी करा …. अशी मागणी करत पेठवडगाव येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. खासदार हरवल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांतून आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाच्या या मागणीला लोकप्रतिनिधी म्हणून तसेच मराठा समाजाचा एक नेता म्हणून खासदार माने यांनी कोणतीच भुमिका घेतली नाही. तसेच जिल्हाभर चाललेल्या या आरक्षणाच्या लढ्यात ते कोठेच दिसले नाहीत असा आरोप करत सकल मराठा समाजाने हा मोर्चा काढला. ते हरवल्याची गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

    बापूSSS समाजाचा रोष तुम्हाला परवडणार नाही, तुमचा जाहीर निषेध; सुभाष देशमुखांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा उद्रेक
    एक मराठा….लाख मराठा अशा घोषणा देताना शोधून द्या शोधून द्या… आमचा खासदार शोधून द्या! अशा ही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. खासदार धैर्यशील माने यांचा फोटो असलेला डिजीटल बोर्ड सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेमधून फिरवला. पोलीस ठाण्याच्या आवारात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध केला.

    मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाची धग वाढली, गावबंदीचा तट भेदण्यात अजित पवार यशस्वी ठरणार?
    पालिका चौक ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढून पोलिस ठाण्यावर आले. यावेळी पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी अशी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर पुन्हा आंदोलक पालिका चौकात आले. तेथेही त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी त्यांच्या हातातील फलक पोलिसांनी जप्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed