राऊत म्हणाले की, या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटला आहेत तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. मात्र त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला दिले नाही. शिवसेनेचे १६ आमदार आणि ६ खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण दिले आहे. तसेच एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!
या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निमंत्रण देऊन ठाकरे गटाला मात्र या निमंत्रणाच्या यादीतून वगळल्याने शिंदे फडणवीस सरकारने मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सरकारचं करायचं काय? असा सवाल उपस्थित करत सरकारवर नेहमीच्या स्टाईलमध्ये टीका केली आहे. तसेच ज्या पक्षाचा एक आमदार आहे त्यांनाही निमंत्रण दिलं. मात्र शिवसेनेला निमंत्रण नाही, असं ट्विट करत संजय राऊत यांनी मनसेवरही निशाणा साधला आहे. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले असल्याचेही ते म्हणाले आहेत.
बैठकीच्या मुद्द्यावर राऊतांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांनी शिवसेनेला बैठकीसाठी आमंत्रण न दिल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने यासाठी उद्या सर्वपक्षीय संघटनांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निमंत्रणाच्या यादीतून मात्र डावलण्यात आल्याची चर्चा आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फार महत्त्व न देता अन्य राजकीय पक्षांना हे निमंत्रण देण्यात आलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील तरुण आत्महत्या करत आहेत, मग आता हे सरकार आरक्षणाचा आदेश त्यांच्या मृतदेहावर ठेवणार का अशी सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना या बैठकीपासून लांब ठेवण्यात आल्याच्या चर्चा होत आहे. आता यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.