उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व आणि महत्त्व यापुढे काय असणार, आपल्या देशात लोकशाही टिकणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवाद म्हणजे ट्रिब्युनल जर आपल्या मस्तीने आणि मर्जीने वागू लागले, तर देशात कठीण होऊन जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मी अजून निकाल वाचला नाही, पण असं माझ्या कानावर आलं आहे, त्यामुळे तुम्हाला नार्वेकर कुठे भेटले, तर या निकालाची कॉपी तुम्ही त्यांना द्या किंवा वाचून दाखवा” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अनिल परब यांनी निकाल वाचला
यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल थोडक्यात सांगितला. “शिवसेनेच्या ज्या याचिका होत्या, त्याबाबत विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करायचं होतं. त्यांनी प्रतिज्ञापत्र देत फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचं टाईमटेबल मांडलं. त्यासाठी कारण दिलं दिवाळीची सुट्टी आणि हिवाळी अधिवेशन. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत सांगितलं, की एवढे दिवस थांबण्याची गरज नाही.” असं परब म्हणाले.
“दिवाळी आणि अधिवेशनाचे दिवस वगळले, तरी हातात एक महिना शिल्लक राहतो. त्यामुळे त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घ्यावाच लागेल, हा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ठेवण्यात आली आहे. जर अंतिम निवाडा केला नाही तर तो कोर्टाचा अवमान मानला जाईल, आणि त्याची तीव्र दखल घेतली जाईल” असंही अनिल परब म्हणाले.
“न्याय देण्याची परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. त्यामुळे सरत्या वर्षासोबत अपात्र सरकारला निरोप देऊ असा विश्वास आहे” असं यावर उद्धव ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News