भाजप आमदाराच्या समर्थकांनी जाब विचारण्यासाठी आलेल्या एका तरुणाला लोटलाट केली. हात नाही लावायचा साहेब, आमदार करून दिलंय तर प्रश्न विचारणारचं. तर आमदार साहेब गावकऱ्यांना म्हणतात तुम्ही NOC आणा, रस्ता नाही झाला तर गावबंदी करा. दरम्यान गेल्या पंधरा वर्षापासून भाजप आमदार राहिलेल्या हरीश पिंपळे यांना आज एनओसी जिल्हा परिषद देत नाही. पिंपळे हे सरकारमध्ये असून त्यांना एनओसी मिळवण्यात अनेक अडचणी येत असल्याचा प्रकार म्हणजेच दुर्दैवी म्हणावे लागले. त्यातही आमदार साहेब गावकऱ्यांना एनओसी आणायला सांगत आहे. आता हे कठीणच असल्याचं गावकरी म्हणत आहेत.
इतकेच नव्हे तर हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. चिंचोली गावाच्या एका तरुणानं आमदाराच्या समर्थकांकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली, असा आरोपही चिंचोली गावातील तरुण रुद्रास राठोड याने केला आहे. यासंदर्भात त्याने बार्शी टाकळी पोलिसात आठ ते दहा भाजप समर्थकांविरुद्ध तक्रार दिली आहे. बार्शी टाकळी पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यासंदर्भात म्हणतात की आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे तरी चौकशी सुरू आहे.
देशभरात आदीशक्तीची १०८ पीठं आहेत. याच शक्ती पिठांच्या मांदियाळीतील चौदावं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी. अकोल्यापासून ३० किलोमीटर अंतरावरील चिंचोली गावाजवळील गडावर रुद्रयानीदेवी विराजमान असून हे एक मोठं तीर्थस्थळ आहे. या तीर्थस्थळापर्यत स्थानिक गावकऱ्यांनी भाजप आमदाराला अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी घातली. परंतु अद्यापही रस्ता नाही आहे. अखेर गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला. काल भाजप आमदार पिंपळे आणि कार्यकर्ते रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आले. त्याचवेळी गडाच्या पायथ्याशी स्थानिक ग्रामस्थानी त्यांना थांबवलं आणि रस्त्या संदर्भात विचारणा केली. परंतु त्यावेळी भाजप आमदारांनी अपशब्द वापरले.
तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालून तरुणांना लोटलाट केल्याचा प्रकार घडला. रस्ता का करीत नाही? तुम्हाला आमदार कशासाठी निवडून दिले? अशा कडक शब्दात लोकांनी प्रश्न समोर ठेवले. या दरम्यान प्रश्न विचारणारा तरुण रुद्रास राठोड आणि आमदारामध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली. या भागात रस्ते चांगले नाहीत, आपण आमदार असून लक्ष देत नाही, रस्ते का करीत नाही म्हणून लोकांनी जाब विचारत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदारासमोर प्रश्नाचा पाऊस सुरू असताना त्यांच्या समर्थकांकडून तरुणांना लोटलाट सुरू झाली. त्यावेळी तरुणांनी देखील उत्तर देत म्हणाले. हात नाही लावायचा, साहेबांना आमदार करून दिले आहे. यावेळी पोलिस देखील हा वाद मिटवण्यासाठी दाखल झाले. पोलिस साहेब आमचे जनप्रतिनिधी आहे ते आम्ही प्रश्न विचारूच. परंतु हा रस्ता आपल्या अंतर्गत येत नसून जिल्हा परिषद हद्दीत असल्याच आमदार म्हणाले होते. याबाबत सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वायरल होते आहे.
भाजप आमदार हरिष पिंपळे ‘मटा ऑनलाईन’शी बोलताना म्हणाले की, मतदारसंघातले आपण अनेक रस्ते तयार केले आहे. राहला प्रश्न चिंचोली रस्त्याचा हा पाच किमीचा रस्ता असून जिल्हा परिषद हद्दीत येतोय. या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेची एनओसी लागते. या अगोदर सुद्धा सुद्रास राठोड याला आपण जिल्हा परिषद उपाध्यक्षांसोबत रस्त्यासाठी बोलणं करून दिले होते. तर उपाध्यक्ष म्हणाले होते, काही रस्ते आमच्यासाठीही राहू द्या साहेब सर्व रस्ते तुम्हीच घेणार का. त्यानंतर काल पुन्हा राठोड आणि त्यांच्या लोकांनी देवीच्या दर्शनासाठी गेलो असतो थांबवलं आणि विचारणा सुरू केली तेव्हाही माझा हा शब्द होता. अजूनही सांगतो गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेऊन आणावे. जर रस्ता नाही झाला तर माझी गावबंदी करा, असा शब्द भाजप आमदारानं दिला आहे. या भागातील जिल्हा परिषद सदस्य ठाकरे गटाचे असून वाद घालणारा तरुण देखील रुद्रास राठोड हा युवासेना आहे, असेही आमदार म्हणाले.