मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मधुकर सिडाम हा काल २२ ऑक्टोबर रोजी जवळपास सकाळी ११ वाजेपासून घरातून बेपत्ता होता. आई वडील आणि गावकऱ्यांनी शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. काल रात्री तो सुद्धा घरी न आल्याने घरच्यांनी आज २३ ऑक्टोबर रोजी अहेरी पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती पोलिसांना दिली. आज सकाळीच अहेरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आपल्या चमुला घेऊन रामय्यापेठ गाव गाठले. त्यानंतर गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता गावातील तलावात त्या मुलाचा चक्क मृतदेह आढळून आला.
मृतदेह अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मुलगा हा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ७ व्या वर्गात शिकत असून तो कालपासून बेपत्ता असल्याचे पोस्ट समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अखेर आज (२३ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास गावातील तलावात त्याचा मृतदेह आढळून आल्याने आईवडिलांनी हंबरडा फोडला. तर अख्ख्या गावात शोककळा पसरली आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात बतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू आहे.
या उत्सवात विविध फुलांचा सजावट करून बतुकम्मा तयार केले जात आहे. काल या उत्सवाचा शेवटचा दिवस होता. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे फुलं गोळा करण्यासाठी महिला, पुरुष आणि मुलं-मुली चांगलीच कसरत घेतात. हा मुलगा सुद्धा अशाच प्रकारे तलावातून कमळाचे फुलं आणण्यासाठी गेल्याची परिसरात चर्चा असली तरी अहेरी पोलीस पुढील तपास करणार आहेत. तलावातून मृतदेह बाहेर काढताना त्याचा शरीरावर केवळ अंतर्वस्त्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र नेमकं काय घडलं हे पोलिसांच्या तपासाअंतीच कळणार आहे.