• Sat. Sep 21st, 2024
शाळा दत्तक योजनेला पालकांचा तीव्र विरोध, शासनाचे डोळे उघडण्यासाठी रविवारी भरवली शाळा

नवी मुंबई : राज्य सरकारच्या शाळा दत्तक योजनेला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा सुरू ठेवून शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालक व शिक्षकांच्या सहकाऱ्याने शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवला. शासनाने सरकारी शाळा दत्तक देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पालकांसह शिक्षक संघटनांचा विरोध आहे. सरकारी शाळा खासगी ठेकेदारांच्या घशात गेल्यास गरिबांना शिक्षण अवघड होईल अशी पालकांना चिंता आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचे डोळे उघडण्यासाठी महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये रविवारी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आंदोलन केले. यावेळी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळणे बंद करावे अशी हाक देण्यात आली.

जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या शाळा दत्तक देण्याच्या हालचाली शासनामार्फत सुरु आहेत. मात्र या निर्णयाने नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत पडले आहेत. शासनाच्या शाळा दत्तक योजनेमुळे गोरगरीब, कष्टकरी, बहुजन, वंचित वर्गातील मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महापालिका स्वतच्या शाळा चालविण्यास सक्षम असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळा पुंजीपतींच्या घशात घालण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेमार्फत सध्या चालवल्या जात असलेल्या शाळांमुळे गरीब कुटुंबातील मुले, मुली देखील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे शिक्षण निशुल्क घेत आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पालकांवरील मोठा आर्थिक भार हलका झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुले शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील नाव कमवत आहेत. अशातच महापालिकेच्या शाळा खासगी ठेकेदारांच्या घशात गेल्यास, कालांतराने पालकांवर आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे शासनाच्या शाळा दत्तक योजनेविरोधात रविवारी महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांचे वर्ग भरले होते.

पालकांची व्यथा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये रविवारी विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली तर पालकांनी शाळेबाहेर आंदोलन करून शासन निर्णयाविरोधात टाहो फोडला.

सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध

गोरगरिबांना शिकवणाऱ्या शाळांचे देखील खासगीकरण झाल्यास आम्ही मुलांना शिकवायचे कसे असा प्रश्न या आंदोलनात सहभागी झालेल्या पालकांनी सरकारला विचारला. यावेळी महापालिकेच्या सर्वच शाळांमधील शिक्षकांनी देखील पालकांच्या आंदोलनाला साथ देत रविवारी शाळा सुरु ठेवल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed