मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोदकुमार वावरे हे आपल्या आईसह गाडगीळ कॉलनी परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारी पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे कुंटुबियांसमवेत राहतात. कोल्हापूर पोलिस दलात काम करणारे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल आशुतोष वसंत शिंदे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली त्यांची पत्नी रेश्मा आशुतोष शिंदे हे दोघे नेहमी किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी वाद घालत असत.
सोमवारी दि. १६ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घरासमोरील तरुण पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून पोलिस कर्मचाऱ्याने हातात सुरा घेऊन फिरण्यास सुरूवात केली. तरूणाच्या घरासमोर आणि तो राहत असलेल्या गल्लीमध्ये हातात सुरा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच विनोदकुमार वावरे यांच्याशी वादही घातला. यानंतर वाद मिटवण्यासाठी आलेल्या विनोदकुमार वावरे यांच्या नातेवाईकांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. यामुळे, विनोदकुमार वावरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आता दोघा पोलीस पती-पत्नीचे निलंबन केले आहे.
व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल:
दरम्यान, सदर पोलिस कर्मचारी हातात सुरा घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असलेला व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत होता. घटना घडून दोन ते तीन दिवस झाल्याने अद्याप देखील या पोलिसांवर कारवाई करण्यात न आल्याने नागरिकांमधून उलट सुलट चर्चा होत होत्या. मात्र कायदा हा सर्वांना एक समान असतो असे म्हणत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अखेर दोन्ही पोलीस पतीपत्नीला निलंबित केले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News