१ लाख ५४ हजार कोटींचा वेदांत प्रकल्प आला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असती. एअरबससारखा प्रकल्पही येऊ शकला नाही. तहसीलदार, नायब तहसीलदार यांसारखी पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले होते. पोलीस विभागाचाही यात समावेश करण्यात आला होता. मात्र, याला विरोध होताच महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखविण्यात आले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कमी महत्त्वाच्या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता, असे देशमुख म्हणाले.
कापूस विदर्भात होत असून प्रक्रिया उद्योग पश्चिम महाराष्ट्रात आहेत. उद्योगांसाठीची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी हजारोंना रोजगार देणाऱ्या प्रमोद मानमोडे यांच्या कार्याचे कौतुक केले. विदर्भात २० टेक्स्टाइल पार्क सुरू व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकी देण्याचे काम गिरीश गांधी करतात, असे अनिल देशमुख म्हणाले. नोकरी मागणारे नाही तर देणारे बना, हे वाक्य मानमोडे यांनी खरे करून दाखविले, अशा शब्दांत गिरीश गांधी यांनी गौरव केला. उद्योग उभा करण्यासाठी आलेल्या अडचणींची माहिती देत एक लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे मानमोडे यांनी सांगितले. विदर्भासाठी एकत्र येण्याची गरजही मानमोडे यांनी व्यक्त केली.
सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शुक्रवारी झालेल्या सोहळ्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, निशांत गांधी, अरुण वानखडे, किशोर कडू, नीलेश खांडेकर, मानमोडे यांच्या मातोश्री देवकाबाई मानमोडे, पत्नी निर्मला मानमोडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. आभार ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी मानले.