सुशीलकुमार असोत किंवा प्रणिती शिंदे, मोहोळ टर्निंग पॉईंट
मोदी लाट सुरू असताना २०१४ आणि २०१९ मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त मताधिक्य मिळावे, यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे असोत किंवा प्रणिती शिंदे असोत, मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा टर्निंग पॉईंट आहे. दूरदृष्टी ठेवत सुशीलकुमार शिंदे यांनी राजन पाटलांच्या घरी जाऊन राजकीय भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.
राजन पाटील सुशीलकुमार शिंदेच्या मदतीला येतील का?
माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे राजन पाटील यांना अजितदादांच्या सांगण्यावरून भाजपलाच मदत करावी लागणार यात शंका नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर लोकसभेतील पंढरपूर आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघ अजितदादा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे राजन पाटील आता सुशीलकुमार शिंदे यांना मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुशीलकुमार शिंदे व राजन पाटील भेटीवर शरद पवार गटात अस्वस्थता
शुक्रवारी दुपारी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर येथे जाऊन राजन पाटील यांची भेट घेतली. स्नेहभोजन केले, त्यामुळे सोलापुरातील शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राजन पाटील हे अजित पवार गटाला समर्थन करतायेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट भाजपला पाठिंबा देईल, अशी परिस्थिती असताना महाविकास आघाडीचे नेते भाजप समर्थक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवार गटाचे नेते व मोहोळ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News