मेट्रो प्रकल्पांसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. त्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राच्या माध्यमातून ‘मेट्रो’ला कोणत्याही अडथळ्याविना वीजपुरवठा होत राहील, याची दक्षता घेतली जाते. ‘पुणे मेट्रो’च्या दोन मार्गिकांसाठी दोन स्वतंत्र वीज उपकेंद्रे आणि आपत्कालीन स्थितीत काही अडथळा निर्माण झाल्यास आणखी एक वीज उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेसाठी पिंपरीत; तर वनाझ ते रामवाडी मार्गिकेसाठी वनाझ डेपोत वीज उपकेंद्र आहे. त्याशिवाय, महामेट्रोच्या रेंजहिल्स येथील डेपोत तिसऱ्या उपकेंद्राचा पर्याय (बॅकअप) तयार करण्यात आला आहे. सध्या या तीन उपकेंद्रांपैकी पिंपरी आणि रेंज हिल्स अशी दोनच उपकेंद्रे कार्यरत असून, वनाझ डेपोतील तिसरे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरात दोन ते तीन वेळा मेट्रो सेवा बंद झाल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठी ‘महामेट्रो’ला बराच वेळ लागला.
‘कोणत्याही उपकेंद्रातून मेट्रोला सुरळीत वीजपुरवठा सुरू असताना त्यात अचानक काही अडथळा निर्माण झाल्यास दुसऱ्या उपकेंद्रातून खंडित झालेला विद्युतप्रवाह पुन्हा सुरू होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. ‘ऑटोमेटिक’ स्वरूपात पर्यायी यंत्रणेचे काम सुरू व्हावे आणि मेट्रो वाटेत बंद पडू नये, या दृष्टीने विविध चाचण्या आणि तपासण्या घेण्याचे काम सध्या ‘महामेट्रो’कडून सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात असून, यापुढील काळात अशाप्रकारे मेट्रो बंद पडून प्रवाशांची गैरसोय होणार नाही,’ असा विश्वास ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बॅकअप केंद्रावरच भार
पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांसाठी दोन स्वतंत्र उपकेंद्रे निर्माण करून आपत्कालीन स्थितीमध्ये रेंज हिल्सच्या उपकेंद्राचा वापर करण्याचे नियोजन ‘महामेट्रो’ने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्ट रोजी मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्घाटन होईपर्यंत वनाझ येथील उपकेंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे या मार्गावरील मेट्रोला रेंज हिल्स येथूनच वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे बॅकअप म्हणून तयार केलेल्या उपकेंद्रावरच अधिक ‘लोड’ येत असल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याचे समोर आले आहे.
वनाझ येथील वीज उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे केंद्र सुरू झाल्यानंतर मेट्रोची सेवा कधीही खंडित होणार नाही.
– श्रावण हर्डीकर
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो