• Mon. Nov 25th, 2024

    पाण्यामुळे सुख आले अंगणी, जलजीवन योजनेमुळे घराघरांत पाणी; ग्रामीण भागांतील पाण्याची चिंता मिटली

    पाण्यामुळे सुख आले अंगणी, जलजीवन योजनेमुळे घराघरांत पाणी; ग्रामीण भागांतील पाण्याची चिंता मिटली

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘गावामध्ये विजेचा लंपडाव सुरू होता. त्यामुळे दोन-तीन टाक्या असूनही एकाचवेळी सर्व भागात पाणी पोहोचत नव्हते. जलजीवन योजना झाली आणि एकाच वेळी जादा दाबाने घराघरांमध्ये पाणी पोहोचले. घरात शुद्ध पाणी आल्याने एका अर्थाने घरात सुख आले आहे,’ अशा शब्दांत भोर तालुक्यातील आपटी गावच्या नागरिकांनी भावना व्यक्त केल्या.

    दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत नाहीत. पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात. आपटी गावचे सरपंच शंकरराव पारटे म्हणाले, ‘घराघरांत पाणी आल्याने डोक्यावरचा हंडा उतरला आहे. वेळेची बचत झाली आहे. गावात स्वच्छता वाढली. मुलामुलींच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला नागरिकांना वेळ मिळत आहे. गावात पूर्वी दहा टाक्या असूनही पाणी मिळत नव्हते. आता एकाच सव्वालाख लिटरच्या टाकीमुळे घराघरांत पाणी पोहोचले आहे.’

    ‘पूर्वी गावात विजेच्या लंपडावमुळे पाणी येत नव्हते. गेल्या वर्षी योजना पूर्ण झाली आणि घरोघरी नळ बसले. पूर्वी कमी दाबाने पाणी येत होते. आता जादा दाबाने पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे आमच्या गावांमध्ये सुख आले आहे,’ अशा शब्दांत अंगणवाडी सेविका रंजना पारटे यांनी भावना व्यक्त केल्या.

    पुणे जिल्ह्यात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. येत्या मार्चअखेर १०० टक्के गावांना नळाद्वारे घरात शुद्ध पाणी पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील ५३ गावांमधील घराघरांत पाणी पोहोचल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावले आहेत; तसेच गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.- प्रकाश खताळ, कार्यकारी अभियंता, पुणे जिल्हा परिषद
    Pune News: जिल्ह्यातील गावे ‘पाणीदार’, गावकऱ्यांची तहान भागली, डोळ्यांतील पाणी लुप्त
    दृष्टिक्षेपात जलजीवन मिशन

    १२२४
    जिल्ह्यातील जलजीवन योजना

    ५३
    घराघरांत पाणी पोहोचलेली गावे

    १८५
    लवकरच पाणीपुरवठा सुरू होणारी गावे

    ८,९३,८६२
    पुणे जिल्ह्यातील कुटुंबसंख्या

    ६,८२,१०१
    नळजोडणी झालेली घरे

    २,११,७६१
    नळजोडणी शिल्लक घरे

    १९४३.२५ कोटी
    जलजीवन मिशन योजनेसाठी जिल्ह्यातील खर्च

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed