शहरातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री पवार यांनी हे आदेश दिले. शहराच्या दक्षिण भागातील कात्रज-कोंढवा रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात असून, अपघाती मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही जागा मिळत नसल्याने रखडले आहे. कात्रज ते खडी मशीन चौक या चार किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये ट्रक, टँकर, डम्पर, कंटेनर अशा मोठ्या वाहनांचा समावेश आहे. अवजड वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत असून, छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी व सायंकाळी दोन-दोन तास अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
हॉटेलांवर कारवाईचा बडगा
सांडपाणी व कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याबद्दल खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात अशुद्ध पाणी येत आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, तसेच धरण परिसरातील चोवीस गावांतील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत ‘पीएमआरडीए’ने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, तसेच विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तत्काळ उपाययोजनांची रुपरेषा तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बारा किलोमीटर लांबीच्या दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाचाही आढावा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी, पदपथावर आलेले अतिक्रमण काढावे, तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे, पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, अशा विविध सूचना पवार यांनी केल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.