• Sat. Sep 21st, 2024

‘एमडी’ नाशिकबाहेरुनच! पोलिस आयुक्तालयाचा दावा, शहरातील तिन्ही प्रकरणांचा कसून तपास

‘एमडी’ नाशिकबाहेरुनच! पोलिस आयुक्तालयाचा दावा, शहरातील तिन्ही प्रकरणांचा कसून तपास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) आणि साथीदारांमार्फत नाशिक शहरातील शिंदे गावात तयार होणारे एमडी (मॅफेड्रॉन) हे राज्यासह देशातील विविध भागात आणि विदेशांत विक्री होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. मात्र, नाशिकमध्ये ललितच्या कारखान्यातील एमडी विक्री होत नसल्याचेही समोर आले आहे.

शहरात बाहेरून ड्रग्जचा पुरवठा झाल्याचे अधोरेखित झाले असून, आतापर्यंत दाखल तिन्ही गुन्ह्यांचा कसून तपास नाशिक पोलिसांनी सुरू केला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वडाळा गावातील झोपडीवर धाड टाकून ५२ ग्रॅम एमडी हस्तगत केले. तत्पूर्वी, नाशिकरोडमध्ये सामनगावजवळ एका तरुणाकडून १२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी शिंदे गावातील दुसऱ्या कारखान्यावर कारवाई करून चार किलो एमडी व इतर मुद्देमाल जप्त झाला. हे सर्व गुन्हे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये अमली पदार्थविरोधी पथकाकडे (एनडीपीएस) वर्ग करण्यात आले आहेत. गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी तपासावर लक्ष केंद्रित करत संशयितांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांची पथके नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यांत रवाना झाली आहेत. दरम्यान, वडाळा गाव, सामनगाव आणि शिंदे गावातून अटक झालेल्या संशयितांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार त्यांना एमडी ड्रग्ज डोंगरी अथवा नाशिकबाहेरून मिळायचे. त्यामुळे अद्याप ललित व भूषण यांच्या कारखान्यातून नाशिकमध्ये ‘एमडी’ची विक्री झाल्याचा मुद्दा तपासात समोर आलेला नाही.

‘सीमकार्ड’ बदलामुळे आव्हान

वडाळा गावातील एमडी प्रकरणातील संशयित ‘छोटी भाभी’ आणि तिचा साथीदार मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना ‘एमडी’चा पुरवठा डोंगरी भागातून होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. शिंदे गावातील एमडी प्रकरणातील सर्व संशयितांचा डेटा पोलिसांनी तयार केला आहे. संशयितांना पुरवठा करणाऱ्यांची संपूर्ण माहिती नाशिक ‘एनडीपीएस’ला मिळाली आहे. काही संशयित सतत ‘सीमकार्ड’ बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा माग काढणे आव्हानात्मक ठरत आहे. संशयितांच्या ‘लोकेशन’नुसार राज्यभरात पथके रवाना झाली आहेत.
ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर
नाशिकमध्ये ‘एमडी’चे तीन गुन्हे उघड झाले. त्यापैकी अटक केलेल्या संशयितांनी शिंदे गावातील कारखान्यातून माल खरेदी केल्याचे तपासात अद्याप समोर आलेले नाही. संशयितांना नाशिकबाहेरून एमडी मिळत असल्याने त्यानुसार पथके पुढील तपास करीत आहेत.-अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed