• Sat. Sep 21st, 2024
…नाहीतर तुम्ही कारवाईला सामोरे जा, नंतर तक्रार नको, अजित पवार यांचा रोखठोक इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील यासारखी प्रकरणे ससून रुग्णालयात होत असतील आणि त्यामुळे ससून रुग्णालयाची प्रतिमा ‘निगेटिव्ह’ होत असेल तर ते गंभीर आहे. ससूनची ‘निगेटिव्ह’ प्रतिमा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता (डीन) डॉ. संजीव ठाकूर यांना तंबी दिली.

बी. जे. मेडिकल कॉलेजशी संलग्नित ससून रुग्णालयात ललित पाटील हा ड्रग्जमाफिया उपचार घेत होता. प्रत्यक्षात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होता. त्यानंतर ससूनमध्ये ड्रग्जची विक्रीचे प्रकरण उजेडात आले. गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या आल्या. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी ससून रुग्णालयाबाबतच्या तक्रारींसह सोयी सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बीजेचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले आदी उपस्थित होते. त्यावेळी अजितदादांना देण्यात आलेल्या तक्रारवजा पत्रातील अधिष्ठाताविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर डॉ. ठाकूर यांनी रुग्णालयाच्या विविध आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, शस्त्रक्रिया, मृत्युमुखींची माहिती देणारे सादरीकरण केले.

ड्रग्ज कारखान्याला दादा भुसेंचं संरक्षण, ललित पाटीलकडून किती पैसे मिळाले? संजय राऊत एनसीबीकडे तक्रार करणार
बापलेक शस्त्रक्रिया करतात

‘रुग्णालयात बापलेक शस्त्रक्रिया करतात. सोलापूरलाही असताना तेथेही मुलालाच घेऊन शस्त्रक्रिया करीत होते. एकाच ठेकेदाराला औषधांचे टेंडर दिले जाते. ललित पाटील याला पळून जायला मदत केली. रुग्णालयातील १६ क्रमांक वॉर्डात कोट्यधीश रुग्ण राहतात. त्यांना राहण्यासाठी दिवसाला हजारो रुपये घेतले जातात. रुग्णालयात स्वच्छता नाही… यासारख्या तक्रारींचा पाढा अजित पवार यांनी वाचून दाखविताच अधिष्ठाता डॉ. ठाकूर निःशब्द झाले.

‘त्या’सारखी पुनरावृत्ती नको

‘वैद्यकीय शिक्षण खाते आमच्याकडे आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ आहेत. पुण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे. तुमच्यावर एवढे आरोप होत असेल आणि त्यात तथ्य आहे की नाही ते तुम्ही तपासा. पण मला ललित पाटील ड्रग्जमाफियासारख्या प्रकरणांची पुनरावृत्ती नको,’ अशी तंबीही द्यायला अजित पवार विसरले नाहीत.

Pune News: ससूनमध्ये रोज १८ मृत्यू, क्षमतेपेक्षा अधिक रुग्णभरतीमुळे हॉस्पिटलवर ताण वाढल्याचा दावा

… कारवाईला सामोरे जा

‘ललित पाटील सारख्या प्रकरणांमुळे रुग्णालयाची प्रतिमा ‘निगेटिव्ह’ होणे मी खपवून घेणार नाही. ससून रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करताना किती कष्ट करावे लागले हे मला माहिती आहे. तुम्हाला कोणत्या सुविधा हव्यात त्या सांगा. सामान्य रुग्णांना रुग्णालयात उपचार मिळाले नाही तर ते खपवून घेणार नाही. औषधे मिळत नाही किंवा औषधोपचार झाले नाहीत अशा नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये. तुम्हाला कोणत्या सुविधा हव्यात. त्या सांगा. नंतर तक्रारीला संधी देणार नाही. त्यावेळी कारवाईला सामोरे जा,’ अशा शब्दांत अजितदादांनी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना इशारा दिला.

शरद पवार म्हणाले, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत, पण मिटकरींनी नेमका उलट अर्थ काढला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed