• Sat. Sep 21st, 2024

बुकी सोंटू टोळीविरुद्ध मोक्का! आरआरविरुद्धही दाखल होणार गुन्हा, मदत करणारे ५० रडारवर

बुकी सोंटू टोळीविरुद्ध मोक्का! आरआरविरुद्धही दाखल होणार गुन्हा, मदत करणारे ५० रडारवर

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक करणारा बुकी, ठकबाज अनंत ऊर्फ सोंटू जैन (रा. गोंदिया) व त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) गुन्हा दाखल करण्यात येणार असून, सोंटू व त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

डायमंड एक्स्चेंज डॉट कॉम नावाची लिंक पाठवून सोंटूने अग्रवाल यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला. या ऑनलाइन जुगाराचा सूत्रधार राकेश राजकोट ऊर्फ आरआर असून, पोलिसांनी आता त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग दिल्याची माहिती आहे.

उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सोंटू हा नागपुरातून पसार झाला. त्यानंतर त्याने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही जामीनअर्ज फेटाळत त्याला सात दिवसांत पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे. नागपुरातून पसार झाल्यानंतर सोंटू हा काही दिवस जयपूरमध्ये वास्तव्यास होता. तो फरार झाल्यानंतर त्याला कोणीकोणी आर्थिक व अन्य मदत केली, याची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. या यादीत सुमारे ५० जणांचा समावेश असून, पोलिसांनी आता त्यांचीही चौकशी सुरू केली आहे. आठ जणांचे बयाणही पोलिसांनी नोंदविले. सोंटूच्या आत्मसमर्पणासाठी आणखी तीन दिवस शिल्लक आहेत. त्याच्या अटकेचे जाळे आणखी घट्ट करण्यात आले असले तरी पोलिस सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपताच पोलिस सोंटू व त्याच्या विश्वासूंविरुद्ध आणखी कठोर कारवाईची तलवार उपसतील.
एका व्यक्तीच्या नावे ४ बँकांमध्ये खाती, कोट्यवधीचे व्यवहार,एक चूक अन् बिंग फुटलं, दोघे अटकेत
आणखी एक फसवणूक

अग्रवाल यांच्यासह सोंटूने गोंदियातील अमित नावाच्या व्यापाऱ्याचीही ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून ४० लाखांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अमितने पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र, तक्रार देण्यास तो तयार नाही. त्याने तक्रार देताच पोलिस सोंटू व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करतील. सोंटू व त्याच्या नातेवाइकांविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed