• Sat. Sep 21st, 2024

वाहनचालकांनो सावधान! अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली; तपासणीबाबत मोठा निर्णय

वाहनचालकांनो सावधान! अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली; तपासणीबाबत मोठा निर्णय

पुणे : महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणे आता पुणे ते कोल्हापूर महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांची २४ तास तपासणी सुरू केली आहे. ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वर हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील पुणे ते कोल्हापूरदरम्यान पाच ऑक्टोबरपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लागण्यास मदत होणार आहे.

राज्यातील महामार्गावर होणारे अपघात व त्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबई-पुणे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर परिवहन विभागाकडून वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या तपासणी मोहिमेचा प्रयोग डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान राबविण्यात आला. यामुळे अपघाताचे प्रमाण ३० टक्के आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण ४७ टक्क्यांनी घटले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी इतरही मार्गांवर हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता पुणे ते कोल्हापूर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहनांना शिस्त लावण्यासाठी २४ तास आणि सातही दिवस वाहनांची तपासणी केली जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

Thane News: मोठी बातमी: ठाणे महानगरपालिकेतून अनधिकृत बांधकामांबाबतच्या चौकशीच्या फाईल्स हरवल्या

नियमभंग करणाऱ्यांचे समुपदेशन

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची पथके पुणे ते शिरवळपर्यंत कारवाई करणार आहेत. ‘सातारा आरटीओ’ची पथके शिरवळ ते कराडदरम्यान वाहनांची तपासणी करतील. त्यानंतर कोल्हापूर आरटीओटी पथके कराड ते कोल्हापूरदरम्यान २४ तास वाहनांवर कारवाई करणार आहेत. प्रत्येक विभागात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहेत. पुणे ‘आरटीओ’कडून शिरवळ टोलनाक्याजवळ वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

अशी कारवाई करणार

पुणे-कोल्हापूर महामार्गावर वेगाचे उल्लंघन करणारे, सीट बेल्ट न घालणारे, लेन कटिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, नो-पार्किंगमध्ये वाहने लावणे अशा प्रकारची कारवाई प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) विविध पथकांकडून केली जात आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा तपासणी मोहीम

‘पुणे ते मुंबई एक्स्प्रेस वे’वर २४ तास वाहनांची तपासणी मोहीम एक जूनपासून बंद होती. सहा महिने प्रायोगित तत्त्वावर राबविलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अपघात कमी होऊन वाहनांना शिस्तही लागली होती. त्यामुळे परिवहन विभागाने पुन्हा पाच पाच ऑक्टोबरपासून वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मार्गावर मुंबई, पनवेल, पेण, पिंपरी-चिंचवड आणि ‘पुणे आरटीओ’च्या पथकांकडून तपासणी केली जात आहे.

महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी ‘एक्स्प्रेस वे’प्रमाणेच आता पुणे ते कोल्हापूरदरम्यान महामार्गावर नियमभंग करणाऱ्या वाहनांची २४ तास तपासणी सुरू केली आहे. या वेळी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन केले जाणार आहे.

– संजीव भोर, आरटीओ, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed