• Sat. Sep 21st, 2024

राज्यावर नवं संकट! आगामी हिवाळ्यात इन्फ्लूएन्झाचा त्रास वाढणार, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

राज्यावर नवं संकट! आगामी हिवाळ्यात इन्फ्लूएन्झाचा त्रास वाढणार, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मागील काही वर्षाच्या तुलनेत राज्यात यंदा इन्फ्लूएन्झा (एच१एन१ आणि एच३एन२) या दोन्ही प्रकारचा ताप असलेल्या रुग्णांची संख्या वाढती होती. आगामी हिवाळ्यात ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना सहआजार आहे किंवा श्वसनमार्गाच्या संदर्भातील तक्रारी आहेत त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत रुग्णसंख्येमध्ये यंदा मागील वर्षाच्या तुलनेत अडीचपट वाढ झाली आहे. दोन्ही तापांच्या प्रकारापैकी एच३एन२ च्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हवामानामधील आर्द्रता, रात्री येणारा गारवा आणि दिवसा वाढलेला उष्मा या सगळ्याचा परिणाम इन्फ्लूएन्झाचे रुग्ण वाढण्यात होईल याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. हिवाळ्यामध्ये सहआजार असलेल्या तसेच श्वसनमार्गाचा त्रास असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एच३एन२ चे १९०६ रुग्ण आढळले असून जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये १,३८८ तर जानेवारी ते मे या कालावधीमध्ये केवळ ५१८ रुग्ण आढळून आले आहेत.

व्हायरल आजार जोरात

करोना संसर्गानंतर इतर स्वरूपाच्या आजारांमध्ये वाढ होणार नाही, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र राज्यात यावर्षी व्हायरल स्वरूपाच्या आजाराचा ताण वाढता होता. डेंग्यू, इन्फ्लूएन्झा, एच३एन२, नेत्रविकार, मलेरिया अशा सर्व प्रकारच्या आजारांमध्ये वाढ झाली होती. इन्फ्लूएन्झाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हिवाळ्यामध्ये या तापाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे सार्वजनिक आरोग्यविभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यावेळी तापमानामध्ये घट होते तेव्हा इन्फ्लूएन्झा रुग्ण वाढतात. यंदा अधूनमधून पाऊस पडत होता आणि तापमानामध्ये चढउतार होत राहिल्याने रुग्णसंख्या वाढली होती. सर्व रुग्णांनी वैद्यकीय चाचण्या केल्या नसल्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
World Mental Health Day: करोनानंतर मानसिक आजारांत २५ टक्के वाढ, जाणून घ्या लक्षणं अन् कारणं
असे आढळले रुग्ण

– जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यभरात १,९०६ एच३एन२ रुग्ण
– त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत १,३८८ तर जानेवारी ते मे या कालावधीत केवळ ५१८ रुग्ण
– एच३एन२ साठी करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी ६० टक्के चाचण्या पॉझिटीव्ह
– या स्वरूपाच्या तापामध्ये अनेक रुग्ण स्वतःच्या चाचण्या करून घेत नाहीत
– त्यामुळे प्रत्यक्षात ही रुग्णसंख्या अधिक असण्याची संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. व्ही. पवार यांनी व्यक्त कतेली शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed