• Sat. Sep 21st, 2024

सायबर चोरट्यांची हिंमत वाढली; प्रशासकीय, पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाती, २०० गुन्हे दाखल

सायबर चोरट्यांची हिंमत वाढली; प्रशासकीय, पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाती, २०० गुन्हे दाखल

पुणे : ‘केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी असलेल्या माझ्या मित्राची बदली झाली आहे. त्याच्या घरातील उत्तम दर्जाचे फर्निचर स्वस्तात उपलब्ध आहे,’ असा संदेश जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, राजकीय नेते किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या समाजमाध्यमांतील प्रोफाइलकडून आल्यास सावधान!!! फर्निचर विकण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी ही बनावट खाती म्हणजे सायबर चोरट्यांचा नवीन सापळा आहे. या चोरट्यांनी पोलिसांनाच लक्ष्य केल्याने सायबर सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

समाजमाध्यमांत सामान्य व्यक्तींची बनावट खाती उघडून त्याद्वारे त्यांचे मित्र, परिचित, नातेवाइक यांच्याकडे पैसे मागण्याचा सायबर चोरट्यांचा ‘उद्योग’ जोरात असताना या चोरट्यांनी आता त्यांना अटकाव करणाऱ्या यंत्रणेलाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय आणि पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बनावट खात्यांद्वारे पैशांची मागणी करण्यात येत असल्याने सायबर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांचा समाजमाध्यमांत वावर वाढल्याने चोरटे त्यांनाच लक्ष्य करीत आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय नेत्यानांही याचा फटका बसतो आहे. ‘फेसबुक’वरील बनावट अकाउंटद्वारे फसवणूक झाल्याचे २०० गुन्हे पोलिसांत दाखल आहेत.

जिल्हाधिकारी बोलत असल्याचे सांगून मित्राचे जुने फर्निचर स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी राजस्थानातील एका तरुणाला नुकतीच अटक केली. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फेसबुक मेसेंजरवरून तरुणाला संदेश पाठवून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख अशी ओळख सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेसबुकवर सहा बनावट खाती तयार करण्यात आली आहेत. देशमुख यांनी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांना ही बाब कळवून तक्रार नोंदवली आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे आणि प्रशासकीय अधिकारी रामदास जगताप यांचेही फेसबुकवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. सायबर शाखेच्या प्रमुखांचेच बनावट खाते उघडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्यंतरी एका पोलिस निरीक्षकाच्या नावाने सायबर चोरट्यांनी त्यांच्या पुतणीला संदेश पाठवून फसवणूक केली होती. फेसबुक आणि एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) खाती हॅक करून मित्रांना संदेश पाठवून पैशांची मागणी करण्याच्या या प्रकाराला अनेक जण बळी पडत आहेत.
फडणवीसांच्या पीएच्या नावे बनावट ईमेल, बदलींचे खोटे आदेश, मिरजहून तरुणाला अटक
संतोषकुमार, विक्रमकुमार या नावाचा सीआरपीएफ अधिकारी माझा मित्र नाही. मी कोणालाही फेसबुक मेसेंजरवर क्रमांक मागितलेला नाही. माझ्या नावे फर्निचर संदर्भात संदेश आल्यास प्रतिसाद देऊ नका. तीन महिन्यांत चौथ्यांदा बनावट खाते उघडले गेले आहे. हे खाते रिपोर्ट करावे.- कौस्तुभ दिवेगावकर, प्रशासकीय अधिकारी

प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी, राजकीय नेते किंवा समाजातील प्रतिष्ठितांच्या नावे समाजमाध्यमांत बनावट खाती उघडून संदेश पाठवले जात आहेत. प्रोफाइलवरून फोटो आणि माहिती चोरून अशी खाती उघडणे सोपे आहे. खात्री करून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारावी. प्रलोभन दाखविणारे संदेश आल्यास ते खाते रिपोर्ट करा.- मीनल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

२००
बनावट अकाउंटद्वारे फसवणुकीचे दाखल गुन्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed