यावेळी शरद पवार यांनी नाशिकमधली जिल्हा परिषदेच्या शाळेचे उदाहरण दिले. नाशिक जिल्ह्यात द्राक्षं हे मोठं पीक आहे. या द्राक्षापासून दारु तयार केली जाते. एका दारु तयार करणाऱ्या कंपनीला जिल्हा परिषदेची शाळा दत्तक देण्यात आली आहे. या शाळेबद्दल माहिती घेतली तेव्हा समजले की, गेल्या महिन्यात ज्या मद्य कंपनीला ही शाळा चालवायला दिली आहे त्यांनी शाळेत एक कार्यक्रम ठेवला होता. गौतमी पाटील नाव ऐकलंय का? गौतमी पाटील हिचं नृत्य त्या शाळेत झालं. तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा द्यायचा का?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना विचारला. आपण काय करतोय, कोणत्या पद्धतीने करतोय, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे सांगत शरद पवार यांनी राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शाळेतील गौतमीच्या कार्यक्रमानंतर चौकशीचे आदेश
शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याची बातमी बाहेर आल्यानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा परिषद शाळेत अशा कार्यक्रमांना परवानगी नसून सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात, मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कोणते असावेत, याचं भान बाळगणं महत्त्वाचं आहे. मात्र असा काही कार्यक्रम झाला असल्यास हे धक्कादायक आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले होते.
सोलापूरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला ५ हजारांचं तिकीट
सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनेने २३ ऑक्टोबर रोजी डिस्को दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले होते. याठिकाणी गौतमी पाटील उपस्थित राहणार होती. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी तिकीटांचा दर महागडा ठेवला होता. व्हीव्हीआयपीसाठी ४९९९, व्हीआयपी ९९९, जनरलसाठी ४९९, असे दर ठरले होते. परंतु, ऐनवेळी सोलापूर शहर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.