आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (९ ऑक्टोबर) घाटीला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्याशी चर्चा केली. घाटीतील नेमकी परिस्थिती जाणून घेत औषधांच्या तसेच मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारी रुग्णालयांमध्ये होत असलेले मृत्यू ही गंभीर बाब आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता हे विषय सातत्याने समोर येत आहे. त्यामुळेच नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आलो आहे. नांदेड आणि नागपूरलाही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रश्नावरुन राजकारण करण्याची इच्छा नसून सरकारचे डोळे उघडणे हाच हेतू आहे. याच कारणास्तव २९ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढला होता. आता हाफकिन संस्थेऐवजी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी होणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्राधिकरणामार्फत हे काम अजूनही व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे. मुळात प्राधिकरण स्थापन करण्यामागचा हेतुदेखील संशयास्पद आहे. पुन्हा जिल्हा नियोजन मंडळाचा निधीदेखील पुरेसा मिळत नसल्याची स्थिती असून विकेंद्रीकरणाची खरी गरज आहे. ज्या अधिष्ठातांच्या जबाबदारीवर अख्खे रुग्णालय चालते. त्यांना मनुष्यबळ भरतीचे तसेच इतर अधिकार देण्यात काय अडचण आहे, असाही प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
औषधांचा अपुरा पुरवठा, मनुष्यबळाची कमतरता, यासारख्या प्रश्नांवर विकेंद्रीकरण हेच उत्तर आहे. हे सर्व प्रश्न अधिवेशवात उचलणार आहे, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान, नांदेड येथील खासदाराच्या स्टंटबाजीवरही त्यांनी टीका केली. खरं तर या प्रश्नी आम्ही मोर्चे, आंदोलने करू शकलो असतो, पण अशा प्रकरणांमध्ये चौकशी समिती नेमून कुणाला तरी निलंबित केले जाते. यामुळे खरे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळेच खरे प्रश्न आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.