• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्रातील महत्त्वाचा हायवे तब्बल ३ दिवस राहणार बंद; बैठकीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

    महाराष्ट्रातील महत्त्वाचा हायवे तब्बल ३ दिवस राहणार बंद; बैठकीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर- सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी विभागनिहाय यंत्रणेकडून झालेल्या तयारीचा आढावा घेतला.

    तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. यात्रा काळात देशभरातून देवीदर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची मोठी गर्दी होते. त्यादृष्टीने मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासन यात्रेच्या तयारीत व्यस्त आहे. आढावा बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सोमनाथ माळी, अरविंद बोलंगे, नायब तहसीलदार संतोष पाटील, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे उपस्थित होते.

    २० दिवसांपूर्वी पतीचं निधन, आता भीषण अपघातात महिलेसह मुलाचाही मृत्यू; अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

    जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी पत्रकारांना सांगितले, की नवरात्र महोत्सवाची प्रशासन पातळीवर संपूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेच्या काळात सोललेले नारळ, तेल, प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग येथून प्रवेश दिला जाणार आहे व बाहेर पडण्यासाठी मातंगी मंदिर, जिजाऊ महाद्वारमधून सोडण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत बोगस मंडळींकडून भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी तिन्ही पुजारी मंडळांकडून पुजार्‍यांची यादी मागविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत हंगामी व्यापार्‍यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान वेस या मार्गावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अतिक्रमणविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे.

    कर्नाटक व इतर राज्यातील बसगाड्यांसाठी त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलिस व इतर कर्मचार्‍यांसाठी धर्मशाळा व शहरातील काही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात २१ ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था असणार आहे. तुळजापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक गर्दीमुळे २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान बंद राहणार आहे. शहरात येणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येत असून ३० हजार वाहने थांबतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. त्या-त्या मार्गावर दिशादर्शक नकाशे, डिजिटल फलके लावण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने १०० सीसीटीव्ही कॅमेरा, इतर राज्यातील भाविकांना समजण्यासाठी त्या-त्या भाषेत स्पीकर वरून माहिती सांगण्यात येईल, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed