नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली होती. त्यानंतर राज्यातून मुंबई ते गांधीनगर दरम्यान ‘वंदे भारत’ सुरू झाली. त्यानंतर नागपूर-बिलासपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी आणि मुंबई-मडगाव दरम्यान आणखी चार ‘वंदे भारत’ कार्यान्वित झाल्या. मात्र, पुण्यातून अद्याप एकही ‘वंदे भारत’ सुरू झालेली नाही. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पुण्यातूनही नवी ‘वंदे भारत’ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस ‘वंदे भारत’ म्हणून धावणार असल्याची चर्चा होती; पण त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
दिवसाला सव्वा लाख प्रवासी
पुणे हे देशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणाहून दिवसाला १२०पेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात; तसेच सव्वा लाख प्रवासी येथून प्रवास करतात. त्यामुळे पुण्याला वंदे भारत एक्स्प्रेस पूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. पण, रेल्वे बोर्ड व केंद्र सरकारने पुण्याकडे म्हणावे असे लक्ष दिले नाही. तसेच, ‘वंदे भारत’ सुरू करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींचा दबाव कमी पडत असल्याचीही चर्चा आहे.
पुणे विभागाची तयारी
पुणे रेल्वे विभागाने काही महिन्यांपूर्वीच वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पुणे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई येथे ‘वंदे भारत’ चालविण्याचे व तिची देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभाल व दुरुस्तीसाठी लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ‘वंदे भारत’ सुरू करण्याची घोषणा झाल्यास १५ दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्याची तयारी इलेक्ट्रिक विभागाने ठेवली आहे.
अनेक छोट्या शहरात सेवा
पुण्यापेक्षा अनेक लहान-लहान शहरांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र, देशातील सातवे महानगर असलेल्या पुण्याला वंदे भारत एक्स्प्रेससाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. पुण्याला सध्या खासदार नसले, तरी शिरूर, बारामती आणि मावळचे खासदार आणि राज्यसभेत पुण्याचे प्रतिनिधीत्त्व करणारे खासदार रेल्वे मंत्र्यांपर्यंत ही मागणी पोहोचविणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ठळक मुद्दे
महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस : पाच
सोळा डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेस : २५
आठ डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेस : ९
पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. पुण्यातून बेंगळुरू, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, नागपूर अशा विविध शहरांत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊ शकतात. मात्र, पुण्यावर सतत अन्याय होत आहे. ऑक्टोबरमध्ये स्लिपर व जनरल कोच असलेली वंदे भारत एक्स्प्रेस येत आहे. किमान तेव्हा तरी पुण्यातून ‘वंदे भारत’ सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे.
– हर्षा शहा, चेअरमन, रेल्वे प्रवासी ग्रुप