उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी शहरातील राजकारणावर आणि सिंधी समुदायामध्ये आजही कलानी कुटुंबाचा करिष्मा कायम आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला अटीतटीची लढत देत अनेकदा विजय मिळवल्याचाही इतिहास आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कलानी गटाने राष्ट्रवादीसोबत फारकत घेऊन भाजपला साथ देत महापौरपद मिळवले होते. मात्र त्यानंतर भाजप आणि कलानी गटात झालेल्या राजकीय कुरघोड्यांनंतर कलानी गटाने सेनेला पाठिंबा दिला अन् महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवून भाजपपासून फारकत घेतली.
मात्र त्यानंतर लागू झालेल्या प्रशासकीय राजवटीच्या काळात कलानी गटाचा कल पुन्हा राष्ट्रवादीकडे वळला होता. या काळात पप्पू उर्फ सुरेश कलानी हे कारागृहातून पॅरोलवर बाहेर असल्याने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंताना डावलत कलानी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देत कलानी गटाला पुन्हा राष्ट्रवादीत, स्वगृही आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील एका गटाने अजित पवारांना पाठिंबा दर्शवला होता. कलानी गटाने एकीकडे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थिती लावली तर काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या बैठकीला. त्यामुळे कलानी गटाने तटस्थ भूमिका घेतली होती.
गेल्या काही काळात कलानी गट हा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, पप्पू उर्फ सुरेश कलानी यांचे शरद पवारांशी असलेले जुने संबंध पाहता कलानी गटाचा कल शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तोच गणेशोत्सवाचे निमित्त साधत राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी कलानी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देत सुरेश कलानी यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांसाठी कलानी गटाचा कल शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.