• Sat. Sep 21st, 2024

गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी

गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी

सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण पडताना दिसून येतोय. मात्र, असं असलंतरी साताऱ्यातील एका गावाने एक गाव एक गणपती ही परंपरा आजही जपली आहे. जावली तालुक्यातील चोरांबे गावाने ही अनोखी परंपरा गेली ४० वर्ष अव्याहत जपली आहे. आपल्या घरातलाच गणपती बाप्पा समजून आनंद, उत्साहात पूजाअर्चा करून धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.

काही वर्षांपूर्वी राज्यातील पोलीस दलाने एक गाव एक गणपती ही संकल्पना आणली. पण तो लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा, जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्याने त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. गणेशोत्सव हा हिंदूंचा महत्त्वाचा सण असला तरी चोरांबे गावात तो साजरा केला जात नव्हता.

याबाबत गावातील जुनी-जाणती माणसं सांगतात की, गावाला गणपती धार्जिन नव्हता. पण गणपती बसवल्याने काय वाईट होत असे काहीही सांगितले जात नाही. मात्र, गावाला गणपती धार्जिन नाही एवढीच अंधश्रद्धा मनात बिंबवून गावात गणपती बाप्पा बसवला जायचा नाही व त्याचे पूजनही केले जायचे नाही. मात्र, नवीन पिढीला ही बाब पचनी पडली नाही. त्यांनी वाड-वडिलांच्या या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या गैरसमजुतीला छेद देण्याचे धाडस केले.

या गावातील गावातील घराघरात नाही तर ४० वर्षांपूर्वी या तरुणांनी एकत्र येत गावाचा मिळून एकच गणपती बाप्पा बसवू. बघुया काय वाईट होतय? असा विचार करून जुन्या जाणत्या लोकांचा विरोध झुगारून तरुणांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. ‘चोरांब्याचा राजा’ असे गणपतीचे नामकरण करून गणपती बसवला. गणेशोत्सव संपला वर्ष सरलं पण गावात काहीच अघटित घडलं नाही.

लालबाग राजाच्या चरणी आत्तापर्यंत दीड कोटींहून अधिक दान अर्पण

मग दुसऱ्या वर्षापासून सारं गाव गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन गणेशोत्सव साजरा करू लागले. मग मात्र गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि आता चोरांबे गावात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातोय. गावाची ग्रामदेवता पद्मावती देवीच्या मंदिराजवळ भव्य मंडप उभारून चोरांबे गावात गणेशोत्सव साजरा केला जातो. अख्ख गाव हा माझ्या घरातील गणपती बाप्पा समजून गणेशोत्सवासाठी झटत असतो.

सकाळ-संध्याकाळ बाप्पाच्या आरतीसाठी गाव जमा होतं. श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. गावात एक गाव एक गणपती असला तरी गावातील प्रत्येक घरामध्ये गौराईची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी आकर्षक असे देखावे तयार करण्यात येतात. गावातील मुंबईस्थित चाकरमानी गणेशोत्सवासाठी सहकुटुंब गावात दाखल होती. बापाची आरास, डेकोरेशन, विद्युत रोषणाई, विविध प्रकारचे देखावे, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, गुणवंतांचे सत्कार, गोरगरिबांना मदत आदी गणेशोत्सवातील उपक्रम राबविले जातात.

महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सवासाठी बाप्पाची जी मूर्ती आणली जाते त्याचे पैसे गावातील युवक, ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने देतात. पुढील ३० वर्षे अशा प्रकारे मूर्तीचे पैसे मी देणार अस बुकिंग आताच झालंय यावरूनच विघ्नहर्तां गणेशावर गावकऱ्यांची किती श्रद्धा बसलीय हे लक्षात येते.

मोठी बातमी: उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत ब्लास्ट; भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed