शहरासह जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्य सरकारने पाठविला आहे. या संदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नुकतीच चर्चा झाली होती. पुण्यात सन २०२०पासून अपघातांच्या संख्येत ११३ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुचाकी चालविणारे आणि पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत नोंदविले आहे. विविध ठिकाणची पोलिस ठाणी, ‘आरटीओ’, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडील माहितीच्या आधारे राज्य सरकारने ‘ब्लॅक स्पॉट’बाबतचा अहवाल तयार केला आहे.
नवले पुलावरील अपघात घटले
राज्य सरकारच्या पाहणीमध्ये मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावरील अपघातांची संख्या वाढल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर याचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि पोलिसांच्या माध्यमातून तेथे गेल्या तीन ते चार महिन्यांत विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे नवले पुलावर होणारे अपघात दोन महिन्यांत कमी झाल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.
या ठिकाणी कमी अपघात
शहरातील कमी अपघात होणाऱ्या ठिकाणांची माहिती अहवालात दिली आहे. त्यात पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील अन्य परिसर, विमानतळ, कोंढवा, येरवडा, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड या ठिकाणी सर्वाधिक कमी अपघात होत आहे. यात विमानतळ, येरवडा येथील विविध ठिकाणांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. सध्या अनेक भागांमध्ये कमी अपघात होत असले तरी वाढत्या वाहतूक कोंडी आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यातील अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट’ (२०१९-२१)
चौक/भागाचे नावे अपघातांची संख्या मृत्युमुखींची संख्या
वैदूवाडी चौक (हडपसर) १५ ३
फुरसुंगी रेल्वे पूल (हडपसर) ११ ५
भारती विद्यापीठ रस्ता ११ ५
माई मंगेशकर रुग्णालय (वारजे) १४ १२
नवले पूल (सिंहगड रस्ता) ३० १७
भूमकर पूल (सिंहगड रस्ता) १५ ९
कात्रज चौक (सातारा रस्ता) १६ ८
दरी पूल (कात्रज परिसर) ८ ८
संचेती पूल (शिवाजीनगर) ५ २
मुंढवा रेल्वे पूल १९ ८
चंदननगर १३ ८
खडकवासला ३० २२
कोंढवा (खडी मशिन चौक) ६ १
पिंपरी-चिंचवडमधील ‘ब्लॅक स्पॉट’ (२०१९-२१)
चौक/भागाचे नावे अपघातांची संख्या मृत्युमुखींची संख्या
वाकड पूल (मुंबई-बेंगळुरू महामार्ग) २६ १५
बावधन (मुंबई-बेंगळुरू महामार्ग) २३ १५
चाकण (कुरुळी फाटा) २१ १०
चाकण-तळेगाव चौक २७ ११
राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील ६३ अपघातांच्या ठिकाणांचा अहवाल पाठविला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, ‘एनएचएआय’, रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील येणाऱ्या विविध रस्त्यांवरील सर्वाधिक अपघात होत असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- बप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
(पूर्वार्ध)