• Sat. Sep 21st, 2024

चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगेंची प्रकृती ढासळली, आयसीयूमध्ये दाखल

चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगेंची प्रकृती ढासळली, आयसीयूमध्ये दाखल

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण नकोच ही भूमिका मांडत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपुरात बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती दोन दिवसांपासून खालावली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सरकार ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार समाजबांधवांनी बैठकीतून जाहीर केला आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मंडपात ११ सप्टेंबरपासून टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावली. त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी स्पष्ट नकार दिला. ओबीसी समाजासाठी उपोषण मंडपात जीव देण्यासही तयार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टोंगे यांचा रक्तदाब व शुगर कमी झाल्याचे डॉ. धगडी यांनी केलेल्या तपासण्यांत दिसून आले. त्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. वेळीच उपचार न झाल्यास जीवाला धोका असल्याचेही निदर्शनास आणून दिले. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेत्यांना तातडीने उपोषण मंडपात बोलविण्यात आले. तातडीची बैठक घेऊन टोंगे यांना रुग्णालयात हलविण्यास मंजुरी देण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजतादरम्यान टोंगे यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

चक्काजाम, मोर्चे, बंदचा निर्धार

मराठा समाजासाठी तत्परता दाखविणारे राज्य सरकार ओबीसींच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती ढासळली तरीही सरकारी तत्परता दिसत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना आणि सर्व जातीय संघटनांनी अधिक आक्रमक आंदोलनाचा निर्धार शुक्रवारी जाहीर केला. याअंतर्गत आज, शनिवारी चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच नेत्यांच्या घरांवर तिरडी मोर्चा, चंद्रपूर बंद आणि प्रत्येक तालुक्यात लाक्षणिक संपाचा इशाराही देण्यात आला आहे. येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.
शेतकऱ्याचा पोरगा ओबीसी आंदोलनाचा नायक झाला, तब्बल १२ दिवस अन्न त्यागणारे रवींद्र टोंगे कोण आहेत?
राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारने माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या माध्यमातून २९ सप्टेंबरला बैठकीचे निमंत्रण दिले आहे. पाच दिवस टोंगे यांचे पुढेही आंदोलन सुरूच राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed