• Sat. Sep 21st, 2024

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तरुणाचा नसता प्रताप; काही मिनिटांत रक्तबंबाळ, घटनेनं कुटूंबियांना धक्का

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तरुणाचा नसता प्रताप; काही मिनिटांत रक्तबंबाळ, घटनेनं कुटूंबियांना धक्का

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड / नाशिक : फुगे फोडण्याच्या बंदुकीच्या सहाय्याने मद्यपी तरुणाने स्वत:वर छर्रा झाडून घेतल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. ऐन गणेशोत्सव काळात हा गोळीबारसदृश प्रकार झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

नेमकं काय घडलं?

या जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार झाल्यावर तो घरी रवाना झाला. त्याची चौकशी केल्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल, अशी माहिती आडगाव पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. गोळीबार नेमका कोणी केला आणि का केला, याची चर्चा सुरू असतानाच कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजल्यावर तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की छत्रपती संभाजीनगर रोडवरील नांदूर नाका येथील कौशल्या हॉटेलमागे अमोल पंडित कुमावत (वय ४०) हा खासगी नोकरी करणारा तरुण राहतो. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी रात्री त्याने मद्यप्राशन केले. नाशिकरोडच्या जगताप मळा भागात राहणाऱ्या भावाला फोन करून कौटुंबिक कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याने फोनवर बोलत असतानाच भावाचे घर गाठले. दोघांचे बोलणे झाल्यावर अमोलने बाजूला जाऊन भावाला परत फोन करून भांडण केले. त्यावेळी अमोलने आपल्याजवळील बंदुकीद्वारे स्वतःवर छर्रा झाडला. सुदैवाने तो कानाला चाटून गेल्याने किरकोळ दुखापत झाली. नातेवाइकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून उपचारांनंतर त्याला घरी सोडण्यात आले.
पत्नीच्या माहेरी जाऊन पतीनं केलं असं काही की दोन्ही कुटुंबं हादरली; अंगावर शहारे आणणारी घटना
या घटनेबाबत आडगाव पोलिस अमोल कुमावतचा जबाब नोंदविणार आहेत, अशी माहिती आडगावचे वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे यांनी दिली. छर्याची बंदूक प्राणघातक हत्यार नसल्याने कुमावतवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होणार नाही. तथापि कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed